देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणारं भाजपा ‘गुंड’राज्य आणि ‘गन’राज्य चालवतंय!

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा खेळखंडोबा सुरू आहे. लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या गोळीबारामुळे राज्याभरात भीतीचे वातावरण असताना शुक्रवारी भाजपच्या नेत्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर डेक्कन परिसरातील खंडोजीबाबा चौकात हल्ला केला. यामुळे खळबळ उडाली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अंजली दमानिया यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडीओ शेअर करत भाजप आणि फडणवीसांना सवाल केले. “काय हे ???? फडणवीस, हे काय आहे ? भाजपचे इतक्या खालच्या दर्ज्याचे राजकारण? भाजप विरुद्ध बोलणाऱ्यांवर असा प्राणघाती हल्ला? ताबडतोब या सगळ्यांना नुसती अटक नाही, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अरे अधोगतीकडे वाटचाल होतेय महाराष्ट्राची. देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणार भाजप, गुंडराज्य आणि GUNराज्य चालवतंय. बास आता बास”, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.

पुण्यात काय घडलं?

पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात आज निर्भय बनो उपक्रमांतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण होते. तर ज्येष्ठ कायदेतज्ञ असिम सरोदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार होती. देशात चाललेला अनागोंदी कारभार, सरकारी संस्था व तपास यंत्रणांचा गैरवापर, झुंडशाही, गुंडगिरी, भ्रष्टाचार यावर संबोधन होणार होते. यात भाजपच्या कारभाराची चिरफाड होणार असल्याने भाजपने या सभेला विरोध दर्शवला होता. मात्र, काहीही झाले तरी ही सभा होणाच असा निर्धार निखिल वागळे यांनी केला. त्यामुळे सभास्थळी सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता, मात्र पोलिसांना न जुमानता भाजप आणि मिंधेंच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळीही गोंधळ घातला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, सभेपूर्वी निखिल वागळे हे अॅड. असीम सरोदे यांच्या घरी थांबले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निखिल वागळे आणि अॅड. सरोदे यांनी सभेच्या ठिकाणी जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते, मात्र वागळे आणि अॅड. सरोदे हे सभेसाठी जाणारच यावर ठाम होते. ज्यावेळी ते कार्यक्रमास्थळी निघाले तेव्हा डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. अशा परिस्थितीतही ते सभास्थळी पोहचलेच आणि त्यांची भाषणे झाली.

गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद

महाराष्ट्रात काय सुरुय?

लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या एकामागोमाग एक गोळीबाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकात गोळीबार केला. त्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरही गोळीबार झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चाळीसगाव नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावरही गोळीबार झाला होता. या तिन्ही घटनांमुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे.