सिनेमा – देशभक्तीचा प्रहार

>> प्रा. अनिल कवठेकर 

देशभक्ती, देशप्रेम ही वैश्विक मूल्ये आहेत आणि जगात ती सर्वत्र सारखीच आहेत. या मूल्यांमध्ये कोणालाही बदल करता येत नाही. ही मूल्ये व्यक्त करण्याचे परिमाण वेगळे असतील, पण ही मूल्ये त्यात्या देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात जन्मत असतात. देशभक्ती मांडता येत नाही, सांगता येत नाही. देशभक्ती अंत:करणात असते. एखादा प्रसंग, एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही त्यावर कसे रिअॅक्ट करता यावरून तुमची देशभक्ती, राष्ट्रभक्ती दिसून येते.

दोनच दिवसांनी आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आणि त्याचबरोबर  तो एका वेगळय़ा मानसिक गुलामगिरीमध्ये अडकत गेला. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे, याचा विसर प्रत्येकाला पडत चाललेला आहे. मी जगलो पाहिजे या अत्यंत हीन भावनेने लोक अन्यायाचा प्रतिकार करायला तयार नाहीत. हीसुद्धा एक मानसिक गुलामगिरी आहे. अशा या मानसिक गुलामगिरीवर भाष्य करणारा आणि आपल्यामध्ये देशप्रेम, राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा चित्रपट म्हणजे 1991 साली प्रदर्शित झालेला नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार’ होय. ‘प्रहार’ची कथा आहे मुंबईत राहणाऱ्या पीटर नावाच्या एका तरुणाची. कमांडो प्रशिक्षणाकरिता त्याची निवड होते. आनंदाने तो प्रशिक्षणाला निघतो. तिथे पोहोचल्यानंतर अत्यंत खडूस आणि शिस्तीचा भोक्ता असणाऱ्या मेजर चव्हाणच्या अंडर त्याला ट्रेनिंग घ्यावे लागते. ट्रेनिंगदरम्यान त्याच्या मानसिक आणि शारीरिक क्षमता तपासल्या जातात. मेजर चव्हाणची शिक्षा देण्याची पद्धत, ट्रेनिंगची पद्धत सगळेच वेगळे आहे. तो आणि त्याचे मित्र यशस्वीपणे ट्रेनिंग पूर्ण करतात.

नंतर तो मेजरला पत्र पाठवून लग्नाचे आमंत्रण देतो. मेजर लग्नासाठी मुंबईला येतो. आल्यानंतर कळते की, पीटरचा खून झालेला आहे. तो तिथे थांबून मिलिटरी जीवनाबाहेर असणाऱ्या वास्तवतेचा सामना करत आपल्या पद्धतीने एक युद्ध लढतो. शेवटी मानसिक रुग्ण म्हणून त्याला शिक्षा न करता मनोरुग्णालयात ठेवले जाते आणि इथे चित्रपट संपतो. या कथेला जेव्हा नाना पाटेकरसारखा अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक लाभतो तेव्हा तो या सामान्य कथेचा अत्यंत सुंदर चित्रपटात रूपांतर करतो. ‘प्रहार’ पहिल्यांदा पाहिल्यानंतर जितका आपल्या मनाचा ठाव घेतो तितकाच तो प्रत्येक वेळी पाहताना घेतो. विचार करायला भाग पाडतो. परिस्थितीचे, वास्तवतेचे आणि देशभक्तीचे भान देतो. डोळय़ात अंजन घालतो. चित्रपट हे मनोरंजनाच्या माध्यमातून ज्ञानरंजन करणारे माध्यम आहे.

 यात कमांडो प्रशिक्षणात बराच वेळ खर्ची घातला आहे, पण हे प्रशिक्षण पाहताना कुठेही कंटाळा येत नाही. याचे श्रेय दिग्दर्शकाला द्यावे लागेल. दृश्यातला थरार कुठेही कमी होत नाही. भीतीचे अनेक प्रकार कमांडोंच्या चेहऱ्यावर उमटतात. या प्रशिक्षणातून आपली सुटका नाही हे त्यांना माहीत असते. कमांडो प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर अत्यंत आनंदाने ते मिलिटरीच्या ट्रकमध्ये बसून गाणी गात मौज करतात आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांचे कठोर परिश्रम पाहताना या सगळय़ाचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. हिंदुस्थानी कमांडो प्रशिक्षण खूप अवघड आहे आणि ते छोटय़ा-छोटय़ा दृश्यांमधून व संवादातून आपल्यावर गारुड करत राहते.

‘प्रहार’  संपूर्णपणे मेजर चव्हाण नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. इतर कलाकारांना मोजून संवाद असतील. संवाद ही नाटकाची भाषा असेल तर दृश्य ही चित्रपटाची भाषा आहे. त्या भाषेचा पुरेपूर उपयोग नानांनी आपल्या दिग्दर्शनातून आणि कॅमेऱ्याच्या मांडणीतून केलेला आहे. प्रत्येक वेळेला संवाद हवेच असे नाही. दृश्येच संवाद साधू लागतात आणि दिग्दर्शकाला हवा असणारा परिणाम पाहणाऱ्याच्या मनावर करतात. कमांडो प्रशिक्षण पाहताना कमांडोंविषयी आपल्या मनात आदरभाव निर्माण करतो. जगातले सगळय़ात अवघड प्रशिक्षण हे हिंदुस्थानी  कमांडोंचे आहे आणि असे अवघड ट्रेनिंग घेणारे कमांडोज आपल्या देशात आहेत याचा अभिमान वाटतो. या चित्रपटाला असलेली शैक्षणिक बाजू नानाने उत्कृष्ट पद्धतीने मांडली आहे.

मेकअप न केलेली माधुरी किती सुंदर दिसू शकते ते पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. तिने परिधान केलेला पोशाख आणि त्या पोशाखामध्ये तिची मोहकता नक्कीच कथेला एक उंची देते. आपला भावी पती आपल्याला सोडून निघालेला आहे. म्हणून तिला आलेला लटका राग तिच्यावरचे भाव सांगतात. संवादाची भाषा व देहबोलीतून माधुरीने नैसर्गिक अभिनय सुंदर केला आहे.

या चित्रपटाचे वैशिष्टय़ असे की, निवडलेला प्रत्येक कलाकार जणू याच भूमिकेसाठी जन्मलेला आहे. म्हणजे अतिरेकी भयावहच वाटतात. खंडागळे हा खंडागळेच वाटतो. पीटर हा पीटर वाटतो. शैली शैलीच वाटते. शैलीचे वडील, पीटरचे वडील, हे वडीलच वाटतात. त्यांचे घर सेट वाटत नाही तर ते खरोखरचे वाटते. इथे प्रेक्षक चित्रपट पाहत नाहीत तर त्या प्रशिक्षणात उभे आहोत, त्या घरात उभे आहोत, त्या वस्तीत उभे आहोत आणि तो अनुभव घेतोय असा हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे.

कमांडोच्या वाक्यातूनच मेजर चव्हाण अत्यंत खडूस, कडक शिस्तीचा मेजर ही व्यक्तिरेखा तयार होते. पहाटे चार वाजता त्यांचे प्रशिक्षण सुरू होते आणि ते शूटसुद्धा चार वाजताच झाल्याचे त्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. मेजर चव्हाणचा पहिला संवाद, ‘तुम यहाँ कमांडो ट्रेनिंग के लिये आये हो पिकनिक के लिये नही’ या एका संवादातून मेजर चव्हाण प्रशिक्षण कसे करून घेणार याची जाणीव होते. शब्दातली धार, नजरेतली जरब, व्यक्तिमत्त्वांमधला भारदस्तपणा, उभे राहण्याची, चालण्यातली मिलिटरीची कडक शिस्त नानामध्ये भिनलेली आहे आणि त्याने ती पूर्ण चित्रपटभर कायम ठेवली आहे. ज्यांना भूमिकेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी नक्कीच नानाचा मेजर चव्हाण पाहावा.

प्रशिक्षणातल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात करणे अशक्य आहे, पण ते कलाकारांना करायला भाग पाडले आहे आणि प्रत्येक अवघड गोष्ट खुद्द नानाने परफेक्ट करून दाखवली आहे. मेजर चव्हाणची शिक्षा देण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. मुलींना पाहून शिट्टी मारल्यानंतर नाना ती शिट्टी कोणी मारली ते शोधून काढतो, पण त्याला विचारत नाही. तर डायरेक्ट त्यांना शिक्षा सांगतो. मेजरच्या शिक्षा खूपच कठीण असतात. त्यातूनच खरा हिंदुस्थानी कमांडो तयार होतो हे आपल्याला जाणवते.

मेजर चव्हाण पीटरच्या लग्नासाठी रेल्वे स्थानकावर उतरतो तेव्हा त्याच्या हातात सुटकेस आणि गिफ्ट बॉक्स असतो. नानाने चार ते पाच दृश्यांमध्ये तो गिफ्ट

बॉक्स आपल्या हातात ठेवलेले आहे. त्या

बॉक्सची कंटिन्युटी ही खऱ्या अर्थाने चित्रपट भाषा आहे आणि ती योग्य पद्धतीने नानाने मांडलेली आहे.

मेजर चव्हाणच्या इतक्या कडक शिस्तीमागे त्याच्या बालपणाच्या दुःखाची किनार आहे. एका गाणाऱ्या बाईचा मुलगा, जिला तिच्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसायामध्ये ओढले जाते. तो विरोध करतो, पण एक लहान मूल गुंडांशी लढू शकत नाही. विरोध त्याच्या रक्तातच आहे. लहानपणी पाहिलेल्या गोष्टींचा त्याच्या मनावर झालेला परिणामातून मेजर चव्हाणचे व्यक्तिमत्त्व घडलेले असल्याने तो अनेकदा विक्षिप्त व सनकी वाटतो, पण तो मेजर तसाच हवा हेसुद्धा आपल्याला पटते.

मेजर चव्हाण जेव्हा पीटरच्या गुह्याची फाईल उघडण्याची विनंती इन्स्पेक्टरला करतो ही बातमी पीटरच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांना पुन्हा तो संघर्ष नको असतो. गुंडांसमोर त्यांनी शरणागती पत्करलेली असते. वस्तीतल्या सगळय़ाच दुकानदाराने ती पत्करलेली असते. कुणालाच लढायचे नसते. कदाचित सगळेच मरणाला घाबरत असावेत. जेव्हा मेजर चव्हाण पीटरच्या घरी येतो तेव्हा पीटरचे वडील त्याला खूप काही बोलू शकले असते. मेजर आणि वडिलांच्या संवादातून संघर्ष दाखवला असता, पण पीटरचे वडील या दृश्यात मेजर चव्हाणच्या सणसणीत थोबाडीत लगावतात आणि त्या दृश्याने दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचते.

‘प्रहार’मधली अनेक दृश्ये मला भावलेली आहेत, पण सगळय़ात शेवटचे दृश्य अप्रतिम रूपकात्मक मांडणी करणारे आहे. नाना पाटेकर खिडकीतून डोंगराकडे पाहतोय. संध्याकाळची वेळ आहे. भणाणणारा वारा सुटलेला आहे आणि मेजर चव्हाणला दहा-बारा वर्षांची हजारो नग्न मुले डोंगरावर चढताना दिसतात. मेजर त्यांच्यासमोर उभा राहतो आणि त्यांना ‘कमॉन जोकर’ म्हणत डोंगर चढतो. एका लहानग्याला हाताशी धरतो. त्याला धावता येत नाही. दुसऱ्या एका मुलाला हाताशी धरतो. त्याच्या पायात काहीतरी टोचले आहे. दृश्य संपते. जेव्हा पहिल्यांदा मी सिनेमागृहात ‘प्रहार’ पाहिला होता तेव्हा या दृश्याला प्रेक्षक मंडळी मोठमोठय़ाने हसायला लागली आणि ‘अरे देखो नंगा बच्चा, नंगा बच्चा’ म्हणायला लागली. नानाने मांडलेले  रूपक लोकांना समजले नव्हते. नग्नता हा संदर्भ नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा होता.  कोणताही संस्कार न झालेला. भावना-जाणिवा नसलेला, ज्याला जातपात, धर्म, पंथ असा कोणताही भेद नसलेला शुद्ध बालक! अशी बालके मला हजारोंच्या संख्येने हवी असल्याचे मेजरला या रूपकातून सांगायचे होते. अशा बालकांना मी या देशाकरिता उत्तम कमांडो बनवणार आहे. जे केवळ देशाच्या सीमेचे संरक्षण करणार नाहीत तर सीमेच्या आत होणारा अन्याय, अत्याचार मिटवण्यासाठीही  लढतील. रूपकाच्या माध्यमातून दिलेला हा संदेश किती जणांना समजला हा प्रश्नच आहे. मला जो समजला तो मी मांडला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सीमा सुरक्षित ठेवणे हे केवळ जवानांचे काम आहे का, नागरिकांचेही काही कर्तव्य आहे याचाही विचार व्हायला हवा. यातल्या एका संवादातले शेवटचे वाक्य महत्त्वाचे आहे आणि त्याचा विचार करायला हवा. ‘मै समजता हू, आर्मी ट्रेनिंग हर एक के लिए कंपल्सरी होनी चाहिये. कम से कम जिंदगी का एक साल देश के लिए देना चाहिये. मुफ्त मे मिली हुई आजादी को बहुत सस्ता समझ रहे आज लोक.’ आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला सैनिकी प्रशिक्षण किमान एक वर्षासाठी घ्यायला हवे. 1991 साली आलेल्या चित्रपटातला हा संवाद आजही तितकाच बोलका आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने देश काय आहे ते कळणार नाही.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)