छापा टाकून मला अटक करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न, अनिल देशमुख यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 4 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करत केला.

देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वीची घटना उकरून काढत माझ्याविरुद्ध दिल्लीच्या मदतीने सीबीआय एफआयआर दाखल केली आहे. चार वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे, असे अनिल देशमुख यांनी नमूद केले आहे.

माझ्यावर छापा टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मदतीने ईडी-सीबीआयला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असेही देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतरही देशमुख यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देशमुख यांनी भाजपवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपरोधिकपणे आभार मानले होते. तसेच फडणवीसांकडून खालच्या पातळीचे राजकारण केले जात आहे असेही ते म्हणाले होते.