मुंबईतील अभिनेत्रीला अटक करून 40 दिवस छळ, 3 आयपीएस अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक करून तब्बल चाळीस दिवस तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. अभिनेत्रीने तिच्या विरोधात दाखल झालेल्या गुह्यात योग्य तपास न करता घाईघाईने अटक करण्यात आल्याचा आणि छळ केल्याचा आरोप केला होता.

थेट आयपीएस अधिकाऱ्यांवरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरपी जेठवानी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनैयुलू (डीजी रॅक), माजी विजयवाडा पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांचा समावेश आहे.

कोण आहे कादंबरी जेठवानी?

कादंबरी जेठवानी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2015 मध्ये ‘फेमिना मिस गुजरात’ स्पर्धा जिंकली होती. ती फेमिनाची कव्हर गर्ल राहिली आहे. कादंबरी जेठवानीने हिंदी, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नेमके काय घडले?

एनटीआरचे पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे कादंबरी जेठवानी यांनी रीतसर तक्रार केली होती. त्यात त्यांनी वायएसआर काँग्रेसचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचे म्हटले होते. विद्यासागर यांच्यासह उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या पालकांचा छळ केला. मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे आणले. पोलिसांनी बेकायदेशीरपणे मला आणि पुटुंबाला 40 दिवसांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले, असा कादंबरी जेठवानी यांचा आरोप आहे.