टी-20 क्रिकेटमधील एक पर्व संपले! रोहित, विराट, जाडेजा निवृत्त… गुरू द्रविडही थांबला

टीम इंडियाला यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे पडद्यामागचे कलाकार अर्थात राहुल द्रविड, कल्पक नेतृत्व आणि जबरदस्त फटकेबाजीने हा वर्ल्ड कप गाजविणारा कर्णधार रोहित शर्मा, किताबी लढतीत आपला संपूर्ण अनुभव पणाला लावणारा विराट कोहली, अन् आपल्या दोन संघसहकाऱ्यांच्या अनपेक्षित कृतीने विचलीत झालेला अष्टपैलू रवींद्र जाडेजा या चौकडीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला गुडबाय केला.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अपराजीत राहत थेट जगज्जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाच्या या चार शिलेदारांनी हीच निवृत्तीची योग्य वेळ समजून आपल्या चाहत्यांना जोर का झटका दिला. या चौकडीने एकाच वेळी घेतलेल्या निवृत्तीमुळे हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील एक पर्व संपले. एकाच वेळी प्रशिक्षकासह तीन खेळाडूंनी निवृत्त होण्याची क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होय, हे विशेष.

दोन दशकं टीम इंडियाची भिंत म्हणून राहिलेले अन् आज शिखर म्हणून निवृत्त झालेले टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड  यांनी प्रशिक्षकाच्या रूपाने का होईना पण वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकाला मिठी मारण्याचे स्वप्न साकारले. गतवर्षीचा वन डे वर्ल्ड कप आणि यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपसाठी राहुल द्रविड यांच्याच मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची मोर्चेबांधणी झाली होती. मात्र, वन डेच्या वर्ल्ड कपमध्ये फायनलपर्यंत अजेय असलेल्या हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियाने धूळ चारून जगज्जेतेपद पटकाविले अन् राहुल द्रविड यांचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अखेरच्या क्षणी भंगले. मात्र, यावेळी टीम इंडियाच्या शिलेदारांनी टी-20चा वर्ल्ड कप जिंकून द्रविड सरांना गुरुदक्षिणा दिली. विराट कोहली यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकला नाही. मात्र, अंतिम लढतीत त्याने संकटमोचकाची भूमिका चोखपणे बजावली अन् ‘सामनावीरा’चा बहुमान मिळविला. ‘सामनावीरा’चा पुरस्कार स्वीकारताना हा माझा अखेरचा टी-20 वर्ल्ड कप आहे असे सांगून त्याने सर्वांनाच अचंबित केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून मीदेखील निवृत्त होत असल्याची घोषणा केली. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला जगज्जेतेपदाची गुरुदक्षिणा मिळाली आता माझे काम संपले असे सांगून प्रशिक्षकपद रिकामे केले.

कोहलीने केली सुरुवात जाडेजाने शेवट

रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जाडेजा हे आयपीएल टी-20 क्रिकेटमधील हुकमाचे एक्के आहेत. त्यामुळे हे खेळाडू आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून लगेचच निवृत्त होतील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, टी-20 वर्ल्ड जिंकताच विराट कोहलीने अनपेक्षितपणे निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्माच्याही मनात निवृत्तीचा विचार नव्हता, असे त्याने स्वतःच सांगितले. मात्र, कोहलीसारखा सर्वात फिट खेळाडू आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने रोहितनेही निवृत्तीची हीच योग्य वेळ समजली. त्यानंतर जाडेजानेही निवृत्तीची घोषणा केली.