कुराणाचा अवमान केल्याचा संशय; पाकिस्तानात तरुणाला जिवंत जाळले

कुराणचा अपमान केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात संतप्त जमावाने गुरुवारी एका व्यक्तीला जिवंत जाळले. खैबर पख्तुनख्वामधील स्वात जिह्यातील मदायन भागात ही घटना घडली. या हिंसाचारात 8 जण जखमी झाले. मोहम्मद इस्माईल असे जिवंत जाळलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मदयान येथे फिरण्यासाठी आला होता असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र कुराणच्या कथित अपमानाच्या बातमीनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि संशयिताला सोबत नेले. या वेळी जमावाने पोलीस स्टेशनची तोडपह्ड करून ते जाळले. प्रथम जमावाने मोहम्मद इस्माईलला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडीओ बनवला. तो अर्धमेला होईपर्यंत जमावाने त्याला मारहाण केली. यानंतर जमावातील काही लोकांनी सोबत ज्वलनशील पदार्थ आणून इस्माईलवर ओतून त्याला जाळले.

इस्माईल ‘‘आपण काहीच केले नाही’’ असे ओरडत राहिला, पण जमावाने त्याचे ऐकले नाही. तो मरेपर्यंत जमावाने सोडले नाही. यानंतर जमावाने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला.