भुमरे, तानाजी सावंत, सत्तार, राठोड यांचे ओएसडी ‘फिक्सर’, मित्रपक्षाचाच आरोप

मिंधे सरकारच्या काळात मंत्रीपदावर असलेले संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचे ओएसडी फिक्सर होते, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे. महायुतीमधील मित्रपक्षाकडूनच असा आरोप झाल्याने मिंधे गटात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डच्चू दिलेल्या 16 फिक्सर ओएसडींमध्ये वरील चार माजी मंत्र्यांच्या ओएसडींचाही समावेश असावा, अशीही चर्चा सुरू आहे.

ओएसडी आणि खासगी सचिव नेमताना फिक्सर अधिकाऱ्यांच्या नावाला मंजुरी देणार नाही, अशी कडक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. 16 फिक्सर अधिकाऱयांना त्यांनी यादीतून डच्चू दिला आहे. ते अधिकारी कोण याबद्दल कुजबूज सुरू झाली असतानाच अमोल मिटकरी यांनी संदीपान भुमरेंच्या ओएसडीने पाच कोटींच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप केला. त्यानंतर आज आणखी तीन मंत्र्यांवर आरोप केले.

अब्दुल सत्तार यांचे तत्कालीन ओएसडी विवेक मोगल यांनी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांची शिफारस पैसे घेऊन केली होती, असे मिटकरी म्हणाले. आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे केल्याचा दावा करणाऱया आमदारांना तो निधी कसा मिळतो हेही विचारा, असा सवालही मिटकरींनी उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी आरोप केलेले विवेक मोगल हे आता विद्यमान क्रीडामंत्री दत्ता भरणे यांचे ओएसडी आहेत असे समजते.

मंत्रालयातील आयएएस अधिकाऱयांच्या दालनात दलाल

महायुती सरकारमधील मंत्र्यांचे पीए-पीएस यांच्या नियुक्त्या सध्या वादाच्या भोवऱयात सापडलेल्या असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी तर थेट मंत्रालयातील सनदी अधिकाऱयांवरच अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मंत्रालयातील आयएएस अधिकाऱयांच्या दालनात दलाल कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत असे ते म्हणाले.

…मग आरोपी मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवता? – सुप्रिया सुळे

भ्रष्ट किंवा आरोप असलेल्या व्यक्तींना पीए किंवा ओएसडी म्हणून नेमणार नाही, असा निर्णय घेणाऱया मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोप असलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवले आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. एक निर्णय ओएसडींना आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली.