मुंबईतील प्रत्येक चौकात 25 हजारांची वसुली; अमोल कोल्हे यांचा गंभीर आरोप

राज्यातील ‘ट्रिपल इंजिन सरकारने, ट्रिपल वसुली’ करण्याचे जोरदार सुरू असून मुंबईतील प्रत्येक चौकात दररोज 25 हजारांची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई करण्याचे टार्गेट वाहतूक पोलिसांना दिल्याचा आरोप अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. याबत ट्विट करून त्यांनी वाहतूक विभागाचा ‘वसुली कारभार’ चव्हाटय़ावर आणला आहे.

मुंबईतील एका चौकात महिला वाहतूक पोलिसांनी कोल्हे यांची गाडी अडवून त्यांच्या ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. याबाबत कोल्हे यांनी पोलिसांना विचारले असता त्यांनी आपल्या मोबाईलवर आलेला मेसेजच दाखवला. यानुसार ‘प्रत्येक चौकात 25 हजार रुपयांची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे’ असे निर्देश देण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दररोज 1.63 कोटींची वसुली
प्रत्येक चौकात 25 हजार याप्रमाणे मुंबईतील 652 ट्रफिक जंक्शननुसार दररोज 1 कोटी 63 लाखांची वसुली होत असल्याचा आरोप खासदार कोल्हे यांनी केला आहे. ही मुंबईची स्थिती. इतर शहरांचे काय? त्यामुळे वाहतूक विभागाचा उपयोग वसुलीसाठीच होतो का, याचे स्पष्टिकरण संबंधित विभागाने द्यावे, असे आव्हानच कोल्हे यांनी दिले आहे.

कोल्हेंच्या गाडीवर 16 हजार 900 चा दंड
दरम्यान, कोल्हे यांच्या ट्विटला वाहतूक पोलिसांनीदेखील री-ट्विटकरून उत्तर दिले आहे. ‘महोदय आम्ही चौकशी केली असून आपले वाहन एमए14 एफएचवर 28 डिसेंबर 2019 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध रस्त्यांवर 15 ई-चलनानुसार 16900 रुपये प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. हा दंड थकीत दंड भरण्यासाठीच विनंती केल्याचे’, पोलिसांनी कोल्हे यांना रिट्विट करताना म्हटले आहे.