अमेरिकेने नंबर वनचे सिंहासन राखले, सुवर्णपदकाची बरोबरी झाल्याने चीन दुसऱ्या स्थानी

जागतिक क्रीडा महासत्ता असलेल्या अमेरिकेला गेल्या काही ऑलिम्पिकपासून चीनकडून कडवी टक्कर मिळत आहे. यावेळी चीनने अमेरिकेच्या वर्चस्वाला अखेरच्या दिवसापर्यंत शह दिला. मात्र अमेरिकेने अखेरच्या क्षणी महिला बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतक्त्यात कसेबसे ‘नंबर वन’चे सिंहासन राखण्यात यश मिळविले. सुवर्णपदकाची बरोबरी झाल्याने चीनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यजमान फ्रान्सनेही पाचव्या स्थानी राहत समाधानकारक कामगिरी केली. अमेरिका-चीन यांना सारखीच 40-40 सुवर्णपदके मिळाली, पण रौप्य व कांस्यपदकांमध्ये अमेरिकेने चीनला खूप मागे टाकले.

दुसरीकडे तब्बल 140 कोटी देशवासीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकच्या स्वारीवर गेलेल्या हिंदुस्थानी संघाची ऑलिम्पिक मोहीम सुवर्णपदकाशिवाय समाप्त झाली. 117 खेळाडूंच्या हिंदुस्थानी चमूला केवळ सहा पदके जिंकता आली. ऑलिम्पिक पदकतक्त्यात हिंदुस्थानी संघ 71 व्या स्थानी राहिला. पाकिस्तानचे सात खेळाडूंचे पथक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते, मात्र एक सुवर्णपदक मिळाल्याने हा देश पदकतालिकेत हिंदुस्थानच्या खूप वर म्हणजे 62 व्या स्थानावर राहिला.

सुवर्णपदकासाठी रंगली होती रस्सीखेच

चीनने मायदेशात झालेल्या 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जागतिक क्रीडा महासत्ता असलेल्या अमेरिकेची ऑलिम्पिकमधील मक्तेदारी मोडीत काढत पदकतालिकेत प्रथमच अव्वल स्थान पटकावित इतिहास घडविला होता. तेव्हापासून जागतिक क्रीडा महासत्ता असलेल्या या दोन देशांमध्ये प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थानासाठी जबरदस्त रस्सीखेच रंगलेली बघायला मिळते. यावेळीही तसेच झाले. एक-एका सुवर्णपदकासाठी उभय देशांमध्ये पाठशिवणीचा खेळ रंगला होता.

सुरुवातीला पदकतालिकेत चीन पुढे होता. मग अमेरिकेनेही त्यांना मागे ढकलून अव्वल स्थान काबीज केले. त्यानंतर कधी चीन, तर कधी अमेरिका ‘नंबर वन’च्या सिंहासनावरून एकमेकांना खाली खेचत होते. अखेरच्या दिवशी चीन 40 सुवर्णपदकांसह अव्वल स्थानी होता, तर दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या खात्यातही 39 सुवर्णपदके होती, मात्र अमेरिकेच्या महिला संघाने यजमान फ्रान्सवर बास्केटबॉलच्या सुवर्णपदकाची लढतीत बाजी मारत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावेल. दोन्ही संघांकडे 40-40 अशी सारखीच सुवर्णपदके झाल्याने चीनला अखेरच्या क्षणी दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल.

हिंदुस्थानला मिळाली पाच कांस्यपदके

हिंदुस्थानच्या नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर उर्वरित पाचही कांस्यपदके आहेत. त्यातील तीन नेमबाजीत, एक हॉकी व एक कुस्तीत मिळाले. नेमबाजीत मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानचे पदकाचे खाते उघडले होते. मग मनू भाकरनेच सरबज्योत सिंगच्या साथीत 10 मीटर एअर पिस्टलच्या मिश्र प्रकारात हिंदुस्थानला दुसरे कांस्यपदक जिंकून दिले. त्यानंतर मराठमोळा नेमबाज स्वप्नील पुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हिंदुस्थानच्या हॉकी संघालाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा पराभव केला. मग कुस्तीपटू अमन सहरावतने 57 किलो वजनी गटात हिंदुस्थानला पाचवे कांस्यपदक जिंकून दिले. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अधिक वजनामुळे अपात्र ठरविण्यात आले असले तरी या निर्णयाविरुद्ध ऑलिम्पिक क्रीडा लवादात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून अवघ्या देशवासीयांच्या नजरा या निकालाकडे खिळल्या आहेत.

नीरज, विनेशकडून सुवर्णपदकाची आशा होती

हिंदुस्थानने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई करीत गुणतक्त्यात 48 वे स्थान मिळविले होते, मात्र यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या सुवर्णपदकाची पाटी कोरीच राहिली. एक रौप्य अन् पाच कांस्य अशा एकूण सहा पदकांसह हिंदुस्थानी संघ 71व्या स्थानी फेकला गेला. यावेळी भालाफेकपटू नीरज चोप्रा व महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती.

पात्रता फेरीतच एकच भालाफेक करीत नीरजने सुवर्णपदकाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, तर विनेशने सलामीच्या लढतीत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असलेल्या जपानच्या युई सुसाकीचा पराभव करीत हिंदुस्थानला सुवर्णपदकाचे स्वप्न दाखविले होते. मात्र सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी 100 ग्रॅम वजन अधिक असल्याने विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आल्याने हिंदुस्थानच्या सोनेरी स्वप्नांचा चक्काचूर झाला. मग पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने दुसऱ्याच प्रयत्नांत 92.97 मीटर भालाफेक करीत ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक निश्चित केले. त्यामुळे कारकिर्दीत कधीही नव्वदीपार न गेलेल्या नीरज चोप्राने 89.45 मीटर भालाफेक करीत रौप्यपदकाला गवसणी घातली.