नारळ चोरताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका ड्रायव्हरचा खून

नवी मुंबईतील नेरळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय रुग्णवाहिका चालकाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध नेरूळ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.युवराज अमरेंद्र सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रुग्णवाहिकेवर मदतनीस आणि वेळप्रसंगी पडल्यास ड्रायव्हरचे काम करायचा.

नेरुळमधील डीवाय पाटील हॉस्पिटलजवळ रविवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर नारळपाणी तसेच इतर फेरीवाल्यांच्या गाड्या लागतात. तेथे रुग्णवाहिका उभ्या केलेल्या असल्यामुळे रुग्णवाहिकांचे चालक तेथे बसून असतात.  काही दिवसांपूर्वी तिथल्या फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो काढले होते. या रागातून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

हॉस्पीटलबाहेर गाड्या लावणाऱ्या विकेत्यांमध्ये वाद झाले होते. बुर्जीपावची गाडी लावणाऱ्याचा नारळ पाणी विकणाऱ्या महिलेसोबत वाद झाला होता. बुर्जीपाववाल्याला नारळपाणी विकणाऱ्या महिलेची जागा बळकावायची होती. या महिलेला तिथून हुसकावण्यासाठी तिचे नारळ चोरण्याचा बुर्जीपावची गाडी लावणाऱ्याने कट रचला होता.. हे नारळ चोरत असताना युवराजने फोटो काढले होते. हे फोटो त्याने नारळपाणी विकणाऱ्या महिलेला दाखवले होते.यानंतर या महिलेचे आणि बुर्जीपावची गाडी लावणाऱ्याचे वाद झाले होते.

ही बाब जेव्हा बुर्जीपाववाल्याला कळाली तेव्हा त्याने युवराजला धडा शिकवायचं ठरवले होते. यामुळे त्याने आपल्या साथीदारांसह युवराजला घेरले आणि भर रस्त्यात ठार मारले. रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर बाबासाहेब नाकाडे(28) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. त्यांनी सांगितले की, चार अज्ञात व्यक्तींनी डीवाय पाटील हॉस्पिटलच्या गेटजवळ त्यांची रुग्णवाहिका अडवली. घटनेच्या वेळी रुग्णवाहिका चालक युवराज अमरेंद्र सिंग आणि ज्ञानेश्वर नाकाडे हे वाहनात होते. एका आरोपीने युवराजला रुग्णवाहिकेतून बाहेर काढून त्याच्यावर हल्ला केला.

जखमी झालेल्या नाकाडेने रूग्णालयाच्या गेटजवळून रुग्णवाहिका वेगाने पळवत स्वत:चा जीव वाचवला. त्यांन या घटनेची  रुग्णवाहिकेच्या मालकाला माहिती दिली आणि नंतर दोघांनी मिळून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना युवराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याच्या मानेवर चाकूने वार केले होते. नाकाडे यांच्या तक्रारीवरून नेरुळ पोलिसांनी चार अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.