आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथे डिंभे (हुतात्मा बाबू गेनू सागर) डाव्या कालव्यावर असलेला पूल कोसळला आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांची गैरसोय पाहता प्रशासनाने तात्काळ पुलाचे काम सुरू करावे अन्यथा लोकसभा मतदानावर ग्रामस्थ बहिष्कार टाकतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
टाकेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पाटीलवाडी, चिखलेमळा, वायाळमळा, शिंदेमळा, दरेकरवस्ती, ठाकरवाडी आणि टाकेवाडी गावठाण आदी भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत २५ ते 30 वर्षापूर्वी पूलाचे बांधकाम केले होते. या पुलावरून दररोज अनेक वाहने ये-जा करतात. नुकतेच कुकडी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडले आहे. मंगळवारी रात्री अचानकपणे कालव्यावरील पूल कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी वेळीच पुलाच्या दुतर्फा दगडी व लाकडाच्या सहाय्याने रस्ता बंद करून वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पूल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तसेच डाव्या कालव्याला धरणातून सोडलेले पाणी चालू असल्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास कालवा फुटून कालव्याच्या खालील बाजूस असलेल्या विठ्ठलवाडी,नांदूर,रामवाडी या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो असेही ग्रामस्थ दीपक चिखले व प्रदीप चिखले यांनी सांगितले. पुलाचे काम लवकर मार्गी न लागल्यास लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर व उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. यावेळी सरपंच प्रीती राहुल चिखले, उपसरपंच समीर काळे, पोलीस पाटील उल्हास चिखले, लक्ष्मण वायाळ, भानुदास चिखले, जितेंद्र जाधव, भरत वायाळ, मारुती वायाळ, कैलास चिखले, अनिल चिखले, संतोष वायाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.