Baba Siddique – सुरक्षेत असलेल्या नेत्यांची अशी हत्या तर… बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रीया

राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आली होती व त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करून ती व्हाय दर्ज्याची केल्याचे समजते. बाबा सिद्दीकी यांना सुरक्षा दिलेली असताना असा गोळीबार होणं हे भयंकर असल्याची प्रतिक्रीया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे.

अंबादास दानवे यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. ”बाबा सिद्दीकी यांना सुरक्षा दिलेली असताना असा गोळीबार करून हत्या ही घटना अत्यंत भयंकर. सुरक्षेत असलेल्या नेत्यांची अशी हत्या केली जात असेल तर सुरक्षा नसलेल्या लोकांबद्दल न बोललेले बरे”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.

”राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना मुंबईत घडल्याचे कळले. कारण काहीही असेल, ते निष्पन्न होईलच. मात्र सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यावर गोळीबार होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार उरलेला नाही, याचे हे उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर झालेल्या या हल्ल्याची तरी आपण गंभीर दखल घ्याल, ही अपेक्षा आहे, असे  अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.