महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

लाडक्या कंत्राटदारांना पोसणाऱ्या मिंधे सरकारकडून राज्यात ‘लाडका उद्योगपती’ योजना जोरात सुरू आहे. विमानतळ विकास, धारावी पुनर्विकास, हजारो कोटींचे वीज खरेदी कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आले. हे कमी म्हणून की काय, आता महायुतीच्या सरकारने चंद्रपूरमधील एक शाळाच अदानीला आंदण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

अंबादास दानवे यांनी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे पत्रक आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पत्रकामध्ये चंद्रपूर येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा या अदानी फाऊंडेशनला चालवायला दिल्याचे म्हटले आहे. याचाच उल्लेख करत अंबादास दानवे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात दिला असून महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे उत्तम उदाहरण असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.

चंद्रपूरमधील शाळा अदानीला आंदण! लाडका उद्योगपती योजना राज्यात जोरात, शाळेचे व्यवस्थापन पंधरा दिवसांत बदलण्याचे आदेश

अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘महाराष्ट्र विक्री आहे! देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समुहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. जमीन, उद्योग कमी होते ते आता शाळा देखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार या सरकारने अदानी समूहाकडे दिला आहे. महाराष्ट्र विक्रीला काढल्याचे हे उत्तम उदाहरण सरकारने दिले आहे.’