
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, ”शिरूर तालुक्यातील एका गावातील हा आरोपी आहे. मी कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाही, पण सत्ताधारी पक्षाचं काम करणारा हा आरोपी आहे. शिरूरमधील अनेक लोकांना येथील सत्ताधारी पक्षचा आमदार उज्जैनला घेऊन गेला होता. याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती.”
अंबादास दानवे म्हणाले की, ”एखाद्या भगिनींवर अशा प्रकारे अन्याय आणि अत्याचार करणं, ही प्रवृत्ती ठेवण्याची हिम्मत आताच्या महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. फक्त लाडक्या बहिणी म्हणून दीड हजार रुपये एखाद्याच्या खात्यात टाकलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं, असं नाही. या बहिणीच्या अब्रूचं रक्षण करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर, सगळ्यांचीच आहे. पण सरकारच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे या घटनेच्या निमित्ताने बाहेर निघाल्याचं म्हणता येईल.”