चांगले गणवेश दिले नाही, तर किमान चांगले अन्न तर द्यावे! अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मिंधे-भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या विकास कामांच्या नावाखाली प्रचंड गोंधळ उडाल्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील कळव्यातील एका शाळेत देण्यात येणाऱ्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला. शाळेतील अन्न खाल्यामुळे सुमारे 38 विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास झाला आहे. त्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधी निकृष्ठ दर्जाचे गणवेश आणि आता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे आरोप सरकारवर करण्यात येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सरकारला सुनावत हल्लाबोल केला आहे.

अंबादास दानवे यांनी कळव्यातील खासगी शाळेत घडलेल्या प्रकारावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिंधे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शाळेतील निकृष्ठ दर्जाचे अन्न खाऊन विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. चांगले गणवेश देऊ शकले नाही, या सरकारने लेकरांना किमान चांगले अन्न तर द्यावे! अशा शब्दात दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात या घोषणा केवळ फार्स असल्याचे एकेका घटनेतून समोर येत आहे. शाळा सुरू होऊन सहा महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मात्र मिळालेले नाही. यानंतर आता मुलांना शाळेत मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा देखील घसरला आहे. ‘विषबाधा होईल इतपत खराब माल पुरवायचा म्हणजे हे या सरकारच्या माणुसकी शून्यतेचे लक्षण आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यात ही गत असेल तर अन्यत्र विद्यार्थी काय खात आहेत, हे तपासले पाहिजे’, असे यावेळी अंबादास दानवे म्हणाले.