दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली आहे. पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याला अटक केली आहे.
हैदराबाद येथील आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा-2’ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. स्क्रिनिंगदरम्यान आलेल्या अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
थिएटरमध्ये नक्की काय घडले?
प्रीमियरला अल्लू अर्जुन स्वत: येणार असल्याने तुफान गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे अनेक जण एकमेकांवर पडले. काही लोक जखमीही झाले. या घटनेचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. यामध्ये अल्लू अर्जुनचे चाहते बेशुद्ध अवस्थेत दिसले. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या परिस्थिती हाताळण्यासाठी तोकडी होती. दरम्यान, वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तसेच सौम्य लाठीचार्जसुद्धा करावा लागला. प्रचंड गर्दीमुळे थिएटरचा गेटदेखील ढासळला.
गुन्हा दाखल आणि आता अटक
संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम 105, 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Allu Arjun Arrest – अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, ‘पुष्पा-2’ प्रकरणी कारवाई pic.twitter.com/aGAjjVN6G5
— Saamana Online (@SaamanaOnline) December 13, 2024