गद्दारी करून सत्तेत आलेल्या खोके सरकारच्या काळात घोटाळय़ांची मालिका सुरूच असून वांद्रय़ातील आठ एकरचा भूखंड केवळ दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेच्या घशात घालण्यात आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांच्या वरदहस्ताने हा कारनामा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला आहे. 8.17 एकर असलेल्या या भूखंडाची पिंमत सध्या तब्बल एक हजार कोटी रुपये आहे.
संबंधित संस्थेला हा भूखंड तब्बल तीस वर्षांसाठी देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा महायुती सरकार येण्याची शाश्वती नसल्यामुळे मोठा लीज करार करण्यात आला आहे. शेलार यांच्या निकटच्या व्यक्तीचा याच्याशी संबंध असल्याचेही जैन यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. वांद्रे पश्चिम हा मुंबईतील अत्यंत महागडा भाग आहे. मात्र हा भूखंड सरकारच्या आशीर्वादाने काही खास लोकांना सौंदर्यीकरण आणि मेंटेनन्सच्या नावाखाली अक्षरशः फुकट देण्यात आला आहे. त्यामुळे जनतेच्या हक्काचा हा भूखंड राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांच्या हातात गेल्याने सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याचा आरोपही अक्षय जैन यांनी केला आहे.
संस्थेकडून मराठी क्रिकेटपटू, नागरिकांची लूट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित फाऊंडेशनला नाममात्र दरात 30 वर्षांसाठी भलामोठा भूखंड दिला असताना सरकारच्या जीआरनुसार मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला प्रशिक्षण कामासाठी 2 हजार स्क्वेअर मीटर म्हणजेच वरील संस्थेच्या तुलनेत फक्त 5 टक्के जागा त्याच भूखंडात तब्बल चार कोटींपेक्षा जास्त वार्षिक दर लावून दिल्याचा आरोपही जैन यांनी केला. संबंधित फाऊंडेशनकडून विविध संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱया सुविधांमध्येही लूट सुरू असल्याचेही जैन यांनी म्हटले आहे.