निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सुटल्याच पाहिजेत. तसेच त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्याबद्दलही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.
राजस्थानात पेन्शनर्स सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्यात इमारत बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या इमारतीतील कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील, जिह्यातील नागरिकांना सुविधा पुरवण्यात येतील, असेही ते म्हणाले. निवृत्तीवेतनधारकांच्या इमारतीसाठी निधीची कमतरता भासता कामा नये. सर्व खासदारांनी त्यांच्या विकास निधीचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी करण्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात येईल असेही बिर्ला म्हणाले. निवनृत्तीवेतनधारकांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या आयुष्यात येणारी आव्हाने जाणून घेणे, अडथळे दूर करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.