अलका याज्ञिक यांना ऐकू येणे बंद झाले

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना व्हायरल ऍटॅकमुळे ऐकू येणे बंद झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांनी ही माहिती दिली. कानाशी संबंधित दुर्मिळ आजार झाल्याचे त्यांनी सांगितले.

अलका याज्ञिक यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, काही आठवडय़ांपूर्वी, मी फ्लाइटमधून बाहेर पडताच मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही. बरेच लोक मला विचारत होते की मी इतके दिवस सक्रिय का नाही? खूप हिंमत करून मी तुम्हाला हे सांगत आहे. मी तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले. हा एक दुर्मिळ आजार असून सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असे त्याला म्हणतात. हा एका व्हायरल ऍटॅकमुळे झाला आहे. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मला मोठा धक्का बसला आहे. कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.’

हेडफोनवर मोठय़ा आवाजात गाणी ऐकणे टाळा

अलका याज्ञक यांनी चाहत्यांना आणि गायकांना एक महत्त्वाचा सल्लावजा इशारा दिला. हेडफोनवर मोठय़ाने गाणी ऐकणं टाळा असे त्यांना सांगितलंय. माझ्या प्रोफेशनमुळे आरोग्याला होणाऱया हानीबद्दल एखाद्या दिवशी मी नक्कीच बोलेन. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे माझं आयुष्य पुन्हा रुळावर येईल आणि मी तुम्हा सर्वांना लवकरच पुन्हा भेटेन अशी आशा बाळगते. या कठीण काळात तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.