राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा ‘आक्रोश मोर्चा’, कणगर येथील हल्लेखोरांना त्वरित अटक करा

मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात, तसेच विविध मागण्यांसंदर्भात हजारोंच्या संख्येने राहुरी येथील तहसील कार्यालयावर ‘मातंग आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले.

राहुरी तालुक्यातील कणगर येथे लाहुंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर घटनेला सुमारे वीस दिवस झालेत, मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. सदर आरोपीला तीन दिवसांत अटक न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर मातंग समाजाच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

राहुरी तालुक्यासह नगर जिह्यात मातंग समाजावर अत्याचार होत आहेत. या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात तसेच विविध मागण्यांसंदर्भात लहुजी क्रांती सेनेच्या वतीने सोमवारी मातंग आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला गाडगे महाराज आश्रम शाळा येथून सुरुवात होऊन नगर-मनमाड रोड, जिजाऊ चौक, नवी पेठ, शनी चौक, स्टेशन रोड या मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. त्या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून संताप व्यक्त करून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील रजेवर असल्याने नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखविली होती. मात्र, मोर्चेकरी आक्रमक झाले होते. जोपर्यंत तहसीलदार पाटील निवेदन स्वीकारण्यास येत नाहीत, तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन सुरूच राहील, असे जाहीर करताच रजेवर असणारे तहसीलदार पाटील यांनी कार्यालयात येऊन मोर्चाकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.

मोर्चामध्ये लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक-अध्यक्ष विष्णू कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे, सुनील शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक-अध्यक्ष कांतीलाल जगधने, नंदूभाऊ शिंदे, सोन्याबापू जगधने, बाबा साठे, बाबासाहेब शेलार सहभागी झाले होते.