अखिलेश यादव यांनी राहुल गांधींसोबतचा फोटो केला शेअर, पोस्टमधून दिला विशेष संदेश

उत्तर प्रदेशच्या विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नवा नारा दिला आहे. आम्ही ठरवलंय, संविधान, आरक्षण आणि सौहार्द वाचवायचं आहे. बापू-बाबासाहेब-लोहिय यांच्या स्वप्नातला देश घडवायचा आहे, असा नारा अखिलेश यादव यांनी दिला आहे. शिवाय काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

अखिलेश यादव यांनी चोवीस तासात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले हे की, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकजूट आहे आणि कायम राहील. 2027 च्या विधानसभा निवडणूकही एकत्रच लढवू, असा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांचे मुद्देही स्पष्ट आहेत. संविधान, आरक्षण आणि सौहार्द याच्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. याच्या आधी बुधवारी रात्री अखिलेश यांदव यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी काँग्रेसची ताकद मिळाल्याची गोष्टही स्वीकारली आहे.

त्या पोस्टमध्ये अखिलेश यादव यांनी लिहिले आहे की, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एका मोठ्या विजयासाठी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून लढणार आहेत. ‘इंडिया’ आघाडी विजयाचा नवा अध्याय लिहिणार आहे. काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वापासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांमुळे समाजवादी पार्टीची शक्ती अनेक पटीने वाढली आहे.