शिंदे गटातील वाचाळवीरांना भर सभेत अजित पवारांनी सुनावलं, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीचं सरकार अडचणीत आलं होतं. यावरून अजित पवार यांनी बुलढाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटातील वाचाळवीरांवर निशाणा साधला. अजित पवार यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांसमोर वाचाळवीरांना खडे बोल सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, रोख त्यांच्याकडेच होता. यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पण कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात. आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतोय. कुठेही वेडेवाकडे विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते? असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड यांना टोला लगावला.

सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं आहे. त्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत. यशवंतराव चव्हाण यांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. भाषा कसली पाहिजे? तर उद्या कुणी आपल्यावर टीका करायला नकोय. बोलताना अनेक प्रकारचे शब्दप्रयोग करता येतात. त्यामुळे महायुतीचं सरकार त्या विचारांचं आहे. जर कुणी एखाद दुसरं काही बोलून गेलं तर त्याला महायुती सरकारचा पाठिंबा आहे, असं समजण्याचं कारण नाही, हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.