स्वत:चे कौतुक करणारे पुस्तक काढताना बाळासाहेब आणि दिघेंना मिंधे विसरले; अजित पवारांनी टोचले कान

धर्मवीर आणि धर्मवीर-2 या चित्रपटातून स्वत:चे उदात्तीकरण करणारे मिंधे आता स्वत:चेच कौतुक करणारे पुस्तक काढताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना मात्र विसरले. या पुस्तकावर फक्त स्वत:ची छबी छापताना मिंधेना बाळासाहेब आणि दिघेंचा विसर पडला. त्यावर भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिंधेंचे कान टोचत पुन्हा अशी चूक करू नका असे सुनावले.

काही दिवसांपूर्वी धर्मवीर 2 चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. या टिझरमध्ये खोटे प्रसंग दाखविण्यात आले असल्याने टीका सुरू झाली असताना आता शिंदे यांनी पुस्तक काढून स्वत:ला पुन्हा एकदा चमकवले. मात्र नेहमी बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचा मी शिष्य आहे अशी बतावणी करणारे एकनाथ शिंदे या दोघांनाही विसरले. स्वत:ची छबी चमकवताना या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या छायाचित्रांना कुठेही स्थान नव्हते. दरम्यान गडकरी रंगायतन नाटय़गृहात झालेल्या सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना या पुस्तकात काही चुकीचे संदर्भ आहेत, त्यात सुधारणा करण्यात यावी असे कार्यक्रमाच्या आयोजकांना सुनावले.