अजितदादा भैसाटले… आर. आर. पाटलांवर भयंकर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी अनेकदा अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मात्र, आता भाजपबरोबर सत्तेत वाटेकरी झाल्यामुळे अजितदादांना याचा विसर पडला असून, आज तासगांव येथील जाहीर सभेत बोलताना तर ते पूर्णपणे भैसाटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. ‘सिंचन घोटाळा चौकशीच्या फाइलवर तत्कालीन गृहमंत्री असलेल्या आबांनी स्वाक्षरी केली होती. आबांनी केसानं गळा कापला,’ असे विधान अजितदादांनी केले आहे. ही फाइल मला देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली असे त्यांनी सांगितले.

तासगांव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील रिंगणात आहेत. रोहित पाटील हे आर. आर. आबांचे पुत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजयकाकांना भाजपमधून आयात केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज तासगांवमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी सिंचन घोटाळा चौकशीवरून दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले. केवळ मला बदनाम करण्यासाठी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले, असा दावा करताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱयांचा आणि इतर खर्च 42 हजार कोटी एवढा होता. मग 70 हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की त्यातून माझी बदनामी झाली.

गृहमंत्रीपद किती वेळा मागितले

मला एकदा तरी गृहमंत्रीपद द्या, असं मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो. बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडं चालू देणार नाही. मला वेडवाकडं खपतच नाही. मला गृहमंत्री करा, अशी मागणी करूनही वरिष्ठांनी माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

दादांना कोणते अधिकार दिले नाहीत, तुम्हीच सांगा…

‘मी सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. मी पक्षाचा अध्यक्ष होतो; पण नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली 20 वर्षे मी बारामतीत लक्ष घातले नाही. साखर कारखाने, दूध संघ, बँक, खरेदी-विक्री संघ आदी संस्थांमध्ये कोणाला संधी द्यायची याचे सर्वाधिकार त्यांना दिले. चारदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली. अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसांत पद गेले. त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतले हे समजत नाही. नंतरच्या काळात तर पक्षच घेऊन दुसरीकडे जाऊन बसले. त्यातून त्यांना पद मिळाले, पण या आधीसुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले. मी राज्यात अनेकांना मंत्री केले, उपमुख्यमंत्री केले. एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना पदे दिली. लोकशाहीत लोकांची सेवा करण्यासाठी पद लागते. लोकांनी साथ दिली नाही तर आपण सुधारणा करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करून सत्ता प्राप्त केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.