अजित पवार गटाच्या आमदारांपुढे धोक्याची घंटा; प्रत्येकाच्या मतदारसंघात मताधिक्यात घसरण

पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाच्या एकाही आमदाराला त्याच्या मतदारसंघातून स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य देता आले नाही. दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून तब्बल 47 हजार 381 मतांनी पिछाडीवर राहिल्या. तर दुसरीकडे शिरूरमध्ये आंबेगावमधून सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील हेदेखील शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत. 11 हजार 368 मतांनी ते मागे राहिले. एकूणच अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना या निवडणुकीत धोक्याची घंटा आतापासूनच वाजू लागली आहे. दौंडमध्ये भाजप आमदार असून, त्यांनीही 26337 मतांनी त्यांना पिछाडीवर नेले.

पुणे जिह्यात अजित पवार गटाचे शिरूर मतदार संघात, जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, खेड दिलीप मोहिते, हडपसर चेतन तुपे तर बारामती मतदारसंघात इंदापूरचे दत्तामामा भरणे, बारामती स्वतः अजित पवार हे आमदार आहेत. इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार या 2637 मतांनी पिछाडीवर राहिल्या.

जुन्नर अजित पवार गटाचे अतुल बेनके हे आमदार आहेत. या मतदारसंघात आढळराव पाटील 45 हजार 907 मतांनी मागे पडले. तर खेडमध्ये दिलीप मोहिते यांच्या मतदारसंघात 46,263 मतांनी पिछाडीवर आहेत. अशीच काहीशी स्थिती चेतन तुपे यांच्या हडपसर मतदार संघात असून ते 13,399 मतांनी पिछाडीवर राहिले. शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे आमदार आहेत. त्यांनी या मतदारसंघातून डॉ. कोल्हे यांना 27,776 मतांची आघाडी दिली. अजित पवार गटाचे सर्व आमदार शिरूर आणि बारामती या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये अपयशी ठरले. विधानसभा निवडणुकीपर्यंत हे वातावरण कायम राहिल्यास या आमदारांच्या भवितव्यावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आमदारांचे समर्थक कार्यकर्ते आता उघडपणे विरोधात बोलू लागले आहेत. अनेक जण बाजूलादेखील जात असल्यामुळे घसरण सुरू झाली आहे. ही लाट कशी रोखायची याचीदेखील चिंता त्यांना लागली आहे.