शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार एम. के. मढवी यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. घणसोली, तुर्भे स्टोअर्स आणि बोनकोडे गावात मढवी यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. हे चित्र पाहून बंडखोरीमुळे हैराण झालेली महायुती कोमात गेली असून भाजपचे उमेदवार आमदार गणेश नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
ऐरोली मतदारसंघात एकूण 20 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही शिवसेनेचे एम. के. मढवी, भाजपचे गणेश नाईक आणि मिंधे गटाचे बंडखोर विजय चौगुले यांच्यात होणार आहे. चौगुले यांनी 29 नोव्हेंबर रोजी अचानक उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीला आणि गणेश नाईक यांना जोरदार धक्का दिला. चौगुले यांचे बंड थोपवण्यासाठी महायुती कामाला लागलेली असतानाच एम. के. मढवी यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मढवी यांनी तुर्भे स्टोअर्स, घणसोली आणि बोनकोडे गावात प्रचार फेऱया काढल्या. या सर्वच प्रचार फेऱयांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र हे गणेश नाईक यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे ऐरोली मतदारसंघातील प्रत्येक गावातून मढवी यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचार फेऱयांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक संघटनांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याने नाईकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.