टीम इंडियासाठी एअर इंडियानं विमान वळवलं? DGCA कडून चौकशी सुरू

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं दमदार कामगिरी केली आणि 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलं. मात्र बार्बाडोसमध्ये वादळ घोंगावत असल्यानं टीम इंडिया तिथेच अडकून पडली होती. अखेर टीम इंडियाला मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने बार्बाडोसला विशेष विमान पाठवण्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र त्यानंतर जे वृत्त समोर येत आहे त्यामुळे एअर इंडियावर टीका होऊ लागली आहे. कारण हेच विमान सुरुवातीला नेवार्कहून दिल्लीला (NEWARK-DELHI) प्रवाशांना घेऊन जाणार होतं. मात्र ते ऐनवेळी वळवल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली अशी माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे नेवार्क-दिल्ली मार्गावर प्रवास करण्याची अपेक्षा करणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ आणि गैरसोय झाली. या व्यत्ययामुळे एअरलाइनचे ऑपरेशनल निर्णय आणि प्राधान्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची दखल घेतली असून एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की क्रिकेट संघाला परत मायदेशी आणण्यासाठी विमाने तैनात करण्याच्या निर्णयाबाबत DGCA नं एअरलाइन कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. तर, अधिकाऱ्यानं दावा केला की या पुनर्नियोजनामुळे प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावं लागलं नाही, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

नेवार्क ते दिल्ली विमानाची तिकिटे आधीच आरक्षित केलेल्या बहुतेक प्रवाशांना याची आधीच माहिती देण्यात आली. मात्र काही जणांना ही माहिती मिळाली नाही आणि त्यांचे फ्लाइट नो-गो आहे हे तपासण्यासाठी ते विमानतळावर आले. त्यानंतर त्यांना रस्ते मार्गानं न्यूयॉर्कला पाठवण्यात आलं आणि तिथून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये जाण्यात यशस्वी झाले, असं अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं.

हे सर्व कशामुळे झाले? अशी चर्चा सुरू आहे. तर चक्रीवादळानं क्रिकेट संघाच्या प्रवासात अडथळा निर्माण केला. म्हणून हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाला त्यांना घरी आणण्यासाठी विमानसेवा निश्चित करावी लागली. T20 विश्वचषक चॅम्पियन्सना परत आणण्यासाठी ही कृती ठीक मानली जात असली तरी भविष्यात असे व्यत्यय टाळण्यासाठी विमानसेवांची प्राथमिक आणि अधिक नियोजनाची गरज असल्याचं यानिमित्तानं बोललं जात आहे.