तामीळनाडूत तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या तीन तास घिरटय़ा

एअर इंडिया विमान कंपनीचे तिरुचलापल्लीहून शारजाला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे तब्बल तीन तास हवेतच घिरटय़ा घालत होते, अशी माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी पावणेसहा वाजता उड्डाण घेताच विमानाची हायड्रोलिक यंत्रणा फेल झाली. त्यानंतर तब्बल तीन तासांनी विमान सव्वाआठच्या सुमारास सुरक्षित लँड करण्यात आले. त्यानंतर विमानातील 141 प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कळल्यानंतर विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. हायड्रोलिक यंत्रणा फेल झाल्यामुळे विमानातील इंधन आणखी कमी करण्यासाठी वैमानिकाने तीन तास आकाशात घिरटय़ा घातल्याचे सांगण्यात आले. हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर विमानतळावर 20 हून अधिक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या.