एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने गुरुवारी धक्कादायक आरोप केला आहे. प्रवाशाचे विमान हे आधीच आठ तासांपेक्षा अधिक उशिरानं धावत होतं आणि गंभीर बाब म्हणजे या विमानात एअर कंडिशन बंद पडलेलं होतं. ज्यामुळे काही प्रवाशांची शुद्ध हरपली होती. सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं विमान, जे काल दुपारी उड्डाण करणार होतं, ते 20 तासांपेक्षा जास्त उशिरानं आज सकाळी 11 वाजता निघणार आहे.
ही घटना दिल्ली विमानतळावर घडली. गुरुवारी, श्वेता पुंज यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिलं की, फ्लाइट क्रमांक AI 183 नंतर आठ तासांहून अधिक काळ उशीर होऊनही धावपट्टीवरच होतं आणि ‘प्रवाशांना विमानात इतका वेळ बसवून ठेवलंच मात्र एअर कंडिशन देखील सुरू नव्हतं’.
प्रवशांची गैरसोय होत असून देखील विमान कंपनीकडून कोणतीही हालचाल करण्यात येत नव्हती. काही जण बेशुद्ध पडल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर पडण्यास सांगण्यात आलं, अशी माहिती श्वेता पुंज यांनी दिली आहे.
दिल्लीत उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून बुधवारी तापमान 52.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं.
‘जर खासगीकरणाची एखादी गोष्ट अयशस्वी झाली असेल तर ती एअर इंडिया आहे. DGCA [एव्हिएशन रेग्युलेटर] AI 183 फ्लाइटला आठ तासांहून अधिक काळ विलंब झाला आहे, प्रवाशांना एअर कंडिशनिंगशिवाय विमानात बसवण्यात आलं आणि काही लोक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना उतरवण्यात आलं हे अमानवीय आहे’, असं पुंज यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग करत X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एअर इंडियाच्या X हँडलने त्यांना प्रतिसाद दिला की, ‘आपल्याला झालेला त्रास लक्षात घेऊन आम्हाला खरोखरच खेद व्यक्त करतो. कृपया निश्चिंत रहा की आमची टीम यावर सक्रियपणे काम करत आहे आणि प्रवाशांच्या आम्हाला मिळणाऱ्या पाठिंब्याची आणि समजूतदारपणाची प्रशंसा करत आहोत. आम्ही आमच्या टीमला प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे निर्देश दिले आहेत’.
अभिषेक शर्मा या आणखी एका प्रवाशाने एअरलाइनला त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यांचे पालक आणि बोर्डिंग एरियात अडकलेल्या इतर असंख्य प्रवाशांनी घरी परतावे’ अशी विनंती केली.
‘AI 183 ला आठ तासांहून अधिक उशीर झाला आहे. लोकांना विमानात चढण्यास आणि AC शिवाय बसण्यास सांगितलं गेलं. नंतर विमानातून उतरवलं गेलं आणि इमिग्रेशन झालं म्हणून टर्मिनलमध्ये प्रवेश करू दिला नाही’, असं शर्मा यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एअर इंडिया X हँडलने शर्मा यांना पुंज यांच्या सारखाच प्रतिसाद दिला.
इतर अनेक प्रवाशांनी पोस्ट केलेल्या व्हिज्युअलमध्ये मुलांसह लोक जमिनीवर बसलेले दिसतात आणि काहींनी त्यांचे बूट काढले आहेत. ते थकलेले दिसतात.