अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्याला अटक, कोतवाली पोलिसांची कामगिरी

शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱयाला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल होताच, आरोपी पसार झाला होता.

अक्षय बंडू कुऱहाडे (वय 23, रा. अनुसयानगर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपी अक्षय कुऱहाडे हा खूप दिवसांपासून पाठलाग करत होता. त्यानंतर 19 ऑगस्टला आरोपीने पीडित मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पुणे जिह्यात ठिकाण बदलून राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे यादव यांनी दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. आरोपीला लोणीकंद (जि. पुणे) येथून अटक केली. न्यायालयात त्याला हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक शीतल मुगडे करीत आहेत.