नगर शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर गढूळ आणि मैलामिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नगर शहरात फेज टू, फेज 1 व अमृत या तीन पाणी योजना असूनही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. आगरकर मळा, गाडळकर मळा, मनपा कर्मचारी वसाहत, दत्तनगर आदी भागांत नळाला गढूळ आणि मैलामिश्रित पाणी येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. केडगाव उपनगराला पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सावेडी, मध्यवर्ती शहर, मुकुंदनगर, बोल्हेगाव-नागापूर या भागातदेखील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
शहर सुधारित पाणी योजनांवर आतापर्यंत सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अमृतचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मात्र, मागील 14 वर्षांपासून हाती घेण्यात आलेल्या फेज-टू योजनेच्या काही अंतर्गत जलवाहिन्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यातच पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शहरात वारंवार पाणीटंचाई निर्माण होत आहे. पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळण्याचे नगरकरांचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून अधुरेच आहे.
पाणीपट्टी भरणारे वाऱयावर
शहरात सुमारे एक लाख 31 हजार मालमत्तांची नोंद आहे. मात्र, अधिकृत नळजोडांची संख्या 52 हजार एवढीच आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्तांना पाणी मिळते कसे, हा प्रश्नच आहे. अनधिकृत नळजोडांमुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱया नागरिकांना त्यांचे हक्काचे मुबलक पाणी वेळेत मिळत नाही. महापालिका प्रशासन या अनधिकृत नळजोडधारकांकडे दुर्लक्ष करत आहे.
पाणी योजनांवरील खर्च
फेज 1 144 कोटी
फेज 2 116 कोटी
अमृत 140 कोटी
नळजोड 52 हजार
एकूण टाक्या 35
कर्मचाऱयांची वानवा
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अभियंते व इतर कर्मचाऱयांची वानवा आहे. कंत्राटी पद्धतीने काही कर्मचाऱयांची भरती करण्यात आली असली, तरी पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही. पाणी सोडण्याचे नियोजन वारंवार कोलमडत आहे. परिणामी नागरिकांना वेळोवेळी कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
वितरणाचे नियोजन कोलमडले
कल्याण रोड, बुरुडगाव, सारसनगर, कोटला, आरटीओ, लालटाकी, सावेडी उपनगर तसेच केडगाव उपनगर आदी भागात पाण्याच्या 35 टाक्या आहेत. परंतु त्यातील अनेक टाक्यांपर्यंत अद्याप फेज-टूचे पाणी पोहोचलेले नाही. वसंत टेकडी येथे पाणी आल्यानंतर शहरातील टाक्या पाण्याने भरल्या जातात. मात्र, त्यानंतरचे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडत असल्याने शहरात महिन्यातून किमान दोनवेळा तरी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.