लाडक्या कंत्राटदारांसाठी मिंध्यांना हवाय महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील इकबालसिंह चहल यांची वर्णी लावण्याचा घाट घातला जात आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला खडेबोड सुनावले. लाडक्या कंत्राटदारांसाठी मिंध्यांना महिला अधिकाऱ्याचा राजीनामा हवाय, म्हणजे त्यांना महाराष्ट्र लुटायला सोपं जाईल, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुख्य सचिवांवर राजीनाम्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत मिंधे सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतंच महिलांबद्दल असलेल्या दयनीय मानसिकतेबद्दल भाष्य केलं आहे. दुसरीकडे राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच भाजप आणि मिंधे सरकार त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडत आहे. त्यांनी राजीनामा दिला की त्यांच्या जागी मिंधेंचा माणूस येईल आणि त्यांना महाराष्ट्र लुटायला मदत करेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांकडून मते मिळविण्याच्या प्रयत्नात मिंधे सरकार आहे. पण, यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांवर महिलांविरोधात गुन्हे दाखल आहेत याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

n कार्यकाळ संपण्याआधीच महिला अधिकाऱ्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. सुजाता सौनिक यांना का हटवतायत? तर मुख्यमंत्री आणि भाजपच्या लाडक्या कंत्राटदारासाठी!

म्हणून ही लाडकी बहीण पदावरून हटवायची आहे!

सुजाता सौनिक चुकीच्या फाईलवर सही करत नाहीत. त्यामुळेच ही लाडकी बहीण पदावरून हटवायची आहे, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून मिंध्यांवर केला. सुजाता सौनिक यांच्या जागी नंदीबैल आणायचे ठरले आहे. लुटीत प्रशासनाचे सहकार्य असावे म्हणून मुख्य सचिवपदाचे टेंडर निघालेय व ठेकेदारांचा लाडका त्या पदावर येत आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.