दहा वर्षांनी निर्दोष मुक्तता, बिबट्याला घरात कोंडणे पडले महागात; संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बिबट्या घरात घुसल्याने घराला बाहेरून कुलूप लावून घेतल्याने बिबट्याला पकडण्यासाठी गर्दीचा अडथळा येत होता, त्यामुळे पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार करावा लागला होता. या घटनेत पोलिसांनी घराला कुलूप लावून बिबट्याला कोंडून घेणाऱ्याला जबाबदार ठरवत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल दहा वर्षांनंतर या आरोपीची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित हा खटला असल्याने याकडे संगमनेर-अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

नगर जिह्यातील अकोले येथील माळीझाप येथे 3 एप्रिल 2014 रोजी भाऊसाहेब आल्हाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. आल्हाट यांच्या घरात घुसलेल्या बिबटय़ाची माहिती मिळताच अकोले तालुका भाजपचे सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक आणि स्थानिक रहिवाशांनी आल्हाट कुटुंबीयांना घराबाहेर काढत घराला बाहेरून कुलूप लावून बिबट्याला घरात कोंडून घेतले होते.

बिबट्याला घरात कोंडल्यानंतर आणि आल्हाट कुटुंबीयांना घराबाहेर काढल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली होती. आल्हाट यांच्या घरात बिबट्यावा कोंडल्याचे वृत्त अकोले परिसरातील माळीझाप, गुरवझाप, नवलेवाडी आदी भागात पसरले होते. त्यामुळे नागरिकांनी बिबटय़ाला कोंडलेल्या ठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

गर्दीमुळे घटनास्थळी आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱयांना बिबट्याला पिंजऱयात पकडण्यासाठी अडथळे येत होते. त्यामुळे वन विभागाने घटनास्थळी असलेल्या पोलिसांना बघ्यांच्या जमाव पांगविण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. मच्छिंद्र मंडलिक यांनीच घराला बाहेरून कुलूप लावून बिबटय़ास घरात कोंडल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

कनिष्ठ न्यायालयात हा खटला चालला. कनिष्ठ न्यायालयाने मंडलिक यांना दोषी ठरवत शिक्षा आणि दंड केला होता. त्यानंतर मंडलिक यांनी या विरोधात ज्येष्ठ विधिज्ञ अनिल आरोटे यांच्यामार्फत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर या खटल्याचे काम सुरू होते. सुनावणीनंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश घुमरे यांनी अकोले न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द ठरवत सबळ पुराव्याअभावी मंडलिक यांची तब्बल दहा वर्षांच्या कालखंडानंतर निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ऍड. अनिल आरोटे आणि ऍड. धनंजय भोंगळे यांनी मंडलिक यांच्या वतीने काम बघितले.