प्रदूषणकारी प्रकल्प पालिकेच्या ‘काम बंद’ कारवाईनंतर ताळय़ावर

धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले असताना दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेने ‘काम बंद’ कारवाई सुरू केल्यानंतर आता प्रदूषणकारी प्रकल्प ताळय़ावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पालिकेच्या एच/पूर्व वांद्रे विभागात आठ बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी संपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात मुंबईत प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

मुंबईत वाढलेल्या प्रदूषणासाठी प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी नियमावली जाहीर केली आहे. 23 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या 27 प्रकारच्या नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत. यानुसार पालिकेने 3 नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांना ऑनलाइन नोटीस बजावून धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर कार्यवाही केली नसल्याने 550 बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी यानंतरही कार्यवाही होत नसल्याने 763 प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीसही देण्यात आली असून आता बांधकाम ‘सील’ करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बेजबाबदार बांधकाम प्रकल्पदेखील आता ताळय़ावर यायला सुरुवात झाली असून उपाययोजना केल्या जात आहेत.

असे होतेय काम
रस्त्यावरील धूळदेखील प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे पालिकेकडून दररोज 450 किमी रस्त्यांवर टँकरने पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. यासाठी सद्यस्थितीत 24 वॉर्डसाठी सुमारे 150 टँकरच्या माध्यमातून रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यात येत आहे.
डेब्रिजबाबत तक्रार करण्यासाठी 8169681697 हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला असून आठ ते बारा तासांत कारवाई केली जात आहे. या ठिकाणी 7 जूनपासून आतापर्यंत 1986 तक्रारी आल्या असून पालिकेकडून आठ ते बारा तासांत समस्या सोडवली जात आहे.

अशी आहे नियमावली
1.बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच कंपाऊंड वॉल, प्रिंक्लर बसवणे.
2.डेब्रिजची वाहतूक बंदिस्तपणे करणे, डेब्रिज रस्त्यावर टाकण्यास बंदी
3.बांधकामाजळ वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवून वेळोवेळी तपासणी
4.बांधकाम ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.
5.बांधकामाच्या ठिकाणी दिवसातून चार ते पाच वेळा पाण्याची फवारणी करणे.