विमानं, शाळा-महाविद्यालयानंतर आता तिरुपतीमधील अनेक हॉटेलांना बॉम्बने उडविण्याची धमकी

विमान आणि शाळा-महाविद्यालयांनंतर आता तिरुपतीमधील अनेक हॉटेलांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. येथील अनेक हॉटेलांना बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा ईमेल आला आहे. या ईमेलमध्ये ड्रग स्मगलिंग नेटवर्कचा कथित नेता जाफर सादिक याच्या नावाचा उल्लेख असून त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ईडीने अटक केली होती.

धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून पोलीस कर्मचारी आणि श्वानांच्या मदतीने हॉटेल्सची झडती घेतली. ज्यामध्ये ही धमकी फसवी असल्याचा संशय निर्माण झाला. या धमक्यांचे मूळ शोधण्यासाठी पोलीस आता तपास करत आहेत. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तिरुपतीला येतात, त्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय चांगला चालतो.

तिरुपतीमधील लीलामहल, कपीलतीर्थम आणि अलीपिरीजवळील तीन खासगी हॉटेलांना ईमेलच्या माध्यमातून धमक्या मिळाल्या होत्या. तसेच ड्रग माफिया जाफर सादिकचेही नाव ईमेलमध्ये आल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फ्लाइट आणि शाळा-कॉलेजांना बॉम्बच्या धमक्या येत आहेत.

एक दिवस आधी 85 विमाने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यामध्ये एअर इंडियाच्या 20 विमानांचा समावेश होता. ज्या विमानांना धमक्या मिळाल्या होत्या त्यामध्ये 20 एअर इंडिया, 20 इंडिगो, 20 विस्तारा आणि 25 आकासा फ्लाइट्सचा समावेश होता.