ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. लोकांमध्ये संतापाचा वातावरण पसरले होते. या घटनेला काही महिने उलटत नाही तोवर आता मुंबईतील भांडुपमधून संतापजनक घटना समोर आली आहे. भांडूपमध्ये एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा बदलापूरसारखी घटना घडली आहे. शाळेतील लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांनी 3 मुलींची छेडछाड केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. शाळेच्या बेसमेंटमध्ये एक 10 वर्षीय आणि 11 वर्षाच्या दोन विद्यार्थिनी योगासने करत होत्या. त्यावेळी शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्या मुलींची छेडछाड काढली. मुलींनी तत्काळ याबाबत आपल्या योगा शिक्षिकेला सांगितले. तसेच आपल्या घरच्यांनाही याबाबत सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी हे कर्मचारी बेसमेंटच्या पडद्यामागे लपल्याचे दिसत आहेत.
विद्यार्थिनींच्या कुटुंबियांनी याबाबत भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. यात भारतीय न्याय संहिता 74, 78, पोस्को 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपिला अटक केली आहे. शिवाय शाळेने घटनेची तक्रार न करण्यासाठी मुलींच्या पालकांवर दबाव टाकण्यात आल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. शाळेकडे सीसीटीव्ही पाहण्याची मागणी केली असता सहकार्य न केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.