जर्मनीतील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासावर अफगाणींकडून हल्ला, पाकचा झेंडाही उतरवला, व्हिडिओ व्हायरल

जर्मनीतील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दूतावासात घुसून हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. तसेच पाकिस्तानचा झेंडाही उतरवला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अफगाणींची सुरक्षा रक्षकांसोबत चकमक झाल्याचेही दिसत आहे. हल्ल्यानंतर जर्मनीतील फ्रँकफर्ट येथील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हल्ल्याचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र अफगाण निर्वासितांना परत अफगाणिस्तानात पाठवल्यामुळे लोक पाकिस्तानवर नाराज आहेत. याच नाराजीतून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर जर्मन पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे. तालिबान राजवट येण्यापूर्वी लोक अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन जात असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाण्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने कराचीतील जर्मन वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास तात्पुरते बंद करण्यात आले आहे.