मिंध्यांच्या आमदारांकडून हवाई सुंदरीचा विनयभंग! अॅड. असीम सरोदे यांचा खळबळजनक आरोप

मिंधे गटाच्या दोन आमदारांनी दारूच्या नशेत गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये एका एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप अॅड. असीम सरोदे यांनी आज केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

धाराशीवमधील निर्भय बनो सभेत बोलताना असीम सरोदे यांनी हा आरोप केला आहे. सुरतवरून गुवाहाटीला गेल्यावर शिंदे गटाच्या आमदारांचे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य होते. संपूर्ण हॉटेल शिंदे गटाच्या आमदारांसाठी बुक करण्यात आले होते. या हॉटेलमध्ये दारूच्या नशेत झिंगत असलेल्या शिंदे गटाच्या दोन आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केला. हा पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही अॅड. असीम सरोदे यांनी केली.

गुन्हे दाखल करा
यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे प्रवत्ते अतुल लोंढे म्हणाले की, हे गंभीर आरोप आहेत. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार व दोन आमदारांना मारहाण हे दोन्ही आरोप मन सुन्न करणारे आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी खास व्यवस्थेत गुवाहाटीच्या एका पंचतारांकित हॉटेलात आमदारांना ठेवण्यात आले होते आणि यामागे एक ‘महाशक्ती’ आहे हे जगजाहीर होते. हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एका एअर होस्टेसचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला हा प्रकार सरकारने दीड वर्ष दडपून का ठेवला? महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती समजली पाहिजे, सरकारने याची चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

गुवाहाटीच्या याच हॉटेलातून एक आमदार पळाला होता. आठ किमीवरून त्याला पकडून आणण्यात आले. या आमदाराला गुरासारखे कुणी बदडले, याचा शोध घेतला पाहिजे. गुवाहाटीत झिंगणारे गद्दार आज लालदिव्याच्या गाडीत फिरत आहेत, ही लोकशाहीची क्रूर चेष्टा असल्याची टीका सरोदे यांनी केली.

गुवाहाटीत जे घडले ते हिडीस
गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलात महाराष्ट्रातून पळालेल्या गद्दार आमदारांची सोय करण्यात आली होती. या हॉटेलभोवती अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आला होता. दुसऱया ग्राहकांना हॉटेलात येण्यास मनाई करण्यात आली होती. याच हॉटेलसोबत स्पाईस जेट आणि इंडिगो एअरलाईन्सचा करार झाला आहे. त्यामुळे या विमान पंपन्यांच्या एअरहोस्टेस दुसऱया मजल्यावर थांबलेल्या होत्या. हॉटेलच्या लिफ्टमध्ये दारूच्या नशेत झिंगणाऱया कोणत्या गद्दार आमदाराने एअरहोस्टेसशी गैरवर्तन केले. महाराष्ट्राला हे सत्य कळले पाहिजे, पिंबहुना महाराष्ट्रानेच हे सत्य शोधण्याची गरज आहे, असे अॅड. असीम सरोदे म्हणाले.