व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा; पुन्हा सीईटी झाल्यास दिवाळीला वर्ग सुरू होणार

बारावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना उलटत आला तरी सीईटी सेलकडून अद्यापपर्यंत एकाही व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. या दिरंगाईचा मोठा फटका प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना बसणार आहे. विविध सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास होणारा उशीर, अतिरिक्त सीईटी परीक्षेचा घाट यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमांचा पुरता खेळखंडोबा होणार आहे. पुन्हा सीईटी झाल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू होण्यास दिवाळीचा मुहूर्त उजाडेल अशी भीती व्यक्त होत आहे.

ऑल इंडिया कान्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) मान्यतेने यंदा बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा 29 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र या परीक्षेला बहुसंख्य उमेदवारांना बसता आले नाही. या परीक्षेला एकूण 48 हजार 135 विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात 1 लाख 8 हजार 741 एवढय़ा जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे जागा रिक्त राहू नयेत यासाठी पुन्हा परीक्षा होणार आहे. मात्र अद्याप आधीच्याच सीईटीचा निकाल सीईटी सेलने जाहीर केलेला नसताना पुन्हा नव्याने अतिरिक्त सीईटी होणार असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. याशिवाय ही अतिरिक्त सीईटी कधी होणार, त्यासाठीची नोंदणी याविषयी अद्याप कोणतीही सूचना सीईटी सेलकडून देण्यात आलेली नाही.

सीईटी परीक्षा पद्धती पारदर्शक – सीईटी सेलचा दावा 

एमएचटी-सीईटी परीक्षेतील गोंधळाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई, राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर यांना सीईटी परीक्षा पद्धती पारदर्शक आहे, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली. सीईटी परीक्षा पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहित आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त सरदेसाई यांनी केले. सीईटी सेलतर्फे ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषयनिहाय तज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तरतालिकेमध्ये योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरिता सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करून निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार आणि सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरूपात घोषित करण्यात आलेला आहे, असा खुलासा यावेळी करण्यात आला.

मुंबई विद्यापीठांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांची दुसरी यादीही जाहीर

मुंबई विद्यापीठाने बीबीए, बीसीए, बीएमएस या अभ्यासक्रमांच्या नावात बदल करून हे अभ्यासक्रम नव्याने आणले आहे. बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) अशा नावाने अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी महाविद्यालय स्तरावर जाहीरही झाली, मात्र ज्या महाविद्यालयांनी एआयसीटीईची मान्यता असलेले व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे अशा महाविद्यालयांतील प्रवेश सीईटीअभावी अद्याप रखडलेलेच आहेत.

…तर निकाल आणखी लांबणीवर पडेल

अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीवरून सध्या गोंधळ सुरू आहे. त्यामुळे या सीईटी परीक्षांचा निकालही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिवाय 27 आणि 28 जूनला विद्यार्थ्यांना उत्तरतालिका सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उत्तरतालिकेवरील आक्षेपांची संख्या वाढल्यास या परीक्षेचा निकालही पुन्हा लांबणीवर पडेल. परिणामी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशालाही विलंब जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिवाळी उजाडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

यापूर्वी सीईटी सेलकडून 10 जूनपासून विविध सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठीची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली होती, परंतु ती नंतर मागे घ्यावी लागली. ऐनवेळी सीईटी सेलवर वेबसाईटवरील निकालासंदर्भातील जारी करण्यात आलेले पत्र काढून घेण्याची नामुष्की ओढवली आहे. आतापर्यंत विधी तीन आणि पाच वर्षे, कृषी, आर्किटेक्चर, बी डीझाईन्स, एम प्लॅनिंग, बीबीए,बीबीसीए, बीएमएस, बीबीएम, डीपीएन/पीएचएन, बीएसस्सी बीएड अशी विविध सीईटी परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत.