पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते हतबल झाले आहेत. त्यांना आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज आहे. पुण्यातील या पूरपरिस्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

नुकसानग्रस्त नागरिकांना पुण्यातील नागरिकांनी मदत केली पाहिजे, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले. त्यांनी पुण्यातील पूरग्रस्तांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आता राजकारण करायचं नाही, आपली लोकं अडचणीत आहेत, लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलो आहोत. राजकारणासाठी खूप वेळ आहे. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पुन्हा एकदा स्थानिकांवर संकट आलं आहे. या संकटामुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. या सर्व परिस्थितीला प्रशासन आणि महाराष्ट्राचं सरकार जबाबदार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

माझी या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की, थोडावेळ राजकारण, घरफोडी, पक्षफोडी बाजूला ठेवा. माणुसकी दाखवा. हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. माझी मागणी आहे की, या संपूर्ण भागातील नागरिकांसाठी एका वेगळं पॅकेजची घोषणा व्हावी. पाण्याच्या टाक्या तातडीने साफ झाल्या पाहिजेत. दिवसातून दोन ते तीन वेळा फवारणी झाली पाहिजे. स्वच्छ पाणी आणि वीजेची सोय ही सर्वात आधी झाली पाहिजे. यानंतर प्रत्येकाला आर्थिक मदत झाली पाहिजे. प्रत्येकाला एक महिन्याच्या धान्याचा पुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.