मुंबईकडून कधीही वर्ल्ड कप फायनल हिसकावू नका! आदित्य ठाकरे यांचा बीसीसीआयवर निशाणा

हिंदुस्थानात क्रिकेटचे खरे स्पिरिट, क्रिकेटची संस्कृती कुठे आहे ते मुंबईकरांनी पुन्हा एकदा अवघ्या जगाला दाखवून दिलेय. अरबी समुद्राच्या साक्षीने मुंबईकरांच्या आनंदालाही, विजयाच्या जल्लोषाला उधाण आले होते. मुंबईकरांनी तमाम हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या वतीने जगज्जेत्या संघाला मानवंदनाच नव्हे तर जनवंदनाही दिली. मुंबईकरांचे स्पिरिट पाहून शिवसेना नेते-युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही बीसीसीआयवर टीका करताना ‘एक्स’वर आपल्या परखड भावनाही व्यक्त केल्या. मुंबईमध्ये गुरुवारचा उत्साह आणि उत्सव बीसीसीआयसाठी एक संदेशात्मक इशारा आहे. मुंबईकडून कधीही वर्ल्ड कप फायनल हिसकावून घेऊ नका, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

हिंदुस्थानी संघ जगज्जेता झाल्यानंतर मुंबईच्या आनंदाला आलेले उधाण अवघ्या जगाने पाहिले. मुंबईत क्रिकेटची खरी संस्कृती असूनही गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपचा अंतिम सामना मुंबईऐवजी अहमदाबादमध्ये पळवण्याचे धाडस दाखवले होते. बीसीसीआयची ही दादागिरी मुंबईकरांना पटलीही नाही आणि रुचलीसुद्धा नाही. त्याच बीसीसीआयने जगज्जेत्या संघाची विजययात्रा मुंबईत आयोजित करून मुंबईकरांची क्रिकेटप्रेमाची भूक शमवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे क्रिकेटचा जनसागर पाहून भारावलेल्या आदित्य ठाकरे यांनी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडून वर्ल्ड कपची फायनल हिसकावून घेऊ नका, असा प्रेमपूर्वक इशारा बीसीसीआयला दिला.

गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना वानखेडेएवजी मोदी स्टेडियमवर खेळवला होता. या निर्णयाबाबत क्रिकेटप्रेमी बीसीसीआयवर तुटून पडले होते. हिंदुस्थानी क्रिकेटच्या कारकीर्दीत मुंबईइतके प्रेम आजवर कोणत्याही शहरात मिळालेले नाही. तरीही बीसीसीआयने या प्रेमाचा अपमान करत मुंबईला वगळले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर आपल्या बीसीसीआयवर हल्ला चढवत आपल्याला काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे कळवले आहे.

वानखेडे हिंदुस्थानच्या सर्वोत्तम विजयाचा साक्षीदार आहे. 1971 साली हिंदुस्थानने पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतर 2007 चा जगज्जेतेपदाचा आनंदही वानखेडेवर सळसळत्या उत्साहात पार पडला होता. 2011 साली वानखेडेवरच हिंदुस्थानने जगज्जेतेपद पटकावले होते, पण या विजयाच्या निमित्ताने बीसीसीआयने कोणतीही व्यवस्था उभारली नव्हती. त्याची भरपाई आज मुंबईकरांनी करून दाखवली.