महिलांचा आवाज दाबण्यासाठी मिंधे अजून कुठल्या थरापर्यंत जाणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वेच्छेने ते पद सोडून राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष व्हावे यासाठी मिंधे सरकारकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात आहे, असा आरोप करतानाच महिलांचा आवाज दाबण्यासाठी मिंधेंची राजवट आणखी पुठल्या थरापर्यंत जाणार, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल साईटवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान हे येत्या 4 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. सुजाता सौनिक यांनी त्या जागी जावे यासाठी सरकारकडून दबाव आहे. मुद्दा हा आहे की, असे का? फक्त त्या एक अतिशय कर्तबगार स्त्री आहेत आणि भाजप-मिंधेना ते मान्य नाही म्हणून? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सौनिक या केवळ एक महिला आहेत म्हणून त्या पदापर्यंत पोहचलेल्या नाहीत, तर एक अधिकारी म्हणून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत, अनेक दशके कर्तव्य बजावले आहे. 30 जून 2025 रोजी त्या निवृत्त होणार आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांची बदली करू इच्छित असतील तर ते तसा आदेश जारी करू शकतात, पण त्यांच्यात तेवढी हिंमत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

पुढच्या वर्षी निवृत्त होणार असतानाही एका सक्षम अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची सक्ती का करावी? दबावास बळी पडण्यास त्यांना भाग पाडले जाईल का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.