महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही ? आदित्य ठाकरे यांचा फडणवीस आणि मिंध्यांवर घणाघात

पुण्यात आणि राज्यात सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत आहेत. त्यामुळे राज्याला गृहमंत्री आहे की नाही? असा प्रश्न पडतो. सध्या महाराष्ट्रात गृहमंत्री नाहीच, असं सरकार चाललंय,’ असा घणाघात शिवसेना नेतेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर चढवला.

आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील गणपती मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि पुण्यात गेले काही दिवस सलग गोळीबाराच्या होत असलेल्या घटना, त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याविरोधात आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले, यापूर्वीही गायकवाड यांनी अशी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. मात्र, या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलाच नाही, असे सध्याचे चित्र आहे. बदलापूर घटनेमध्येदेखील वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, तक्रार करणाऱया महिला पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिंधे सरकारला फटकारले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असून, त्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल. पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे दोन अडीच वर्षांमध्ये काम केले ते लोकांसमोर आहे. त्यामुळे त्याबाबत जनता निर्णय घेईल. मात्र, ही निवडणूक आम्ही आमच्यासाठी अथवा कोणत्याही पदासाठी लढत नसून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत.’

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हे महाराष्ट्र ठरवेल!

‘आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवेल. जनतेला सर्वांचं काम माहीत असून, महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील काम माहीत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यातील ‘आनंद आश्रम’मध्ये मिंध्यांकडून पैसे उधळले गेल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आश्रमात घडले ते फारच वाईट आहे. मिंधे आतापर्यंत आतमध्ये करत होते, आता ते बाहेर करत आहेत. सगळीकडे पैशांची अशीच उधळपट्टी सुरू आहे.’ पुण्यातील महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी, ‘पुण्यात जिंकणारच हा आमचा फॉर्म्युला आहे,’ असे सांगितले.

महायुतीचा चेहरा भ्रष्ट आणि गद्दारांचा

आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?असा थेट सवाल केला. ‘महायुतीकडूनदेखील चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या असलेला भ्रष्ट, खोके आणि गद्दारांचा चेहराच घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत का? अथवा चेहरा बदलणार आहेत?’ अशी खिल्ली त्यांनी उडवली.

जे पाहिजे असतं ते देवाला माहीत असतं!

‘दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मी जेव्हा जेव्हा देवाचे दर्शन घेतो, तेव्हा त्याच्याकडे काहीच मागत नाही. आपल्याला जे पाहिजे असतं, ते देवाला माहीत असतं. त्यामुळे मी फक्त देवाला मनापासून नमस्कार करतो,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.