पालिकेच्या केडरवर अन्याय का? उपायुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील निर्णयावरून आदित्य ठाकरे यांचा परखड सवाल

मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदी राज्य सरकारी सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या निर्णयावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजप सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. महापालिका उपायुक्त पदाची जबाबदारी अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेने स्वतःच्या केडरद्वारे अतिशय उत्तमरित्या हाताळत त्याद्वारे नागरिकांची सेवा केली. असे असताना मुंबई पालिकेच्या केडरवर हा अन्याय का, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय, राज्यात मिंधे-भाजप सरकारच्या राजवटीत मुंबई महापालिकेतील उपायुक्तांच्या जागेच्या संदर्भात बदल करून राज्य सरकारी सेवेतील अधिकाऱ्यावर लादण्यात येणार आहे. महापालिका उपायुक्तपदाची जबाबदारी अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेने स्वतःच्या केडरद्वारे नेहमीच अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली आणि त्याद्वारे नागरिकांची सेवा केली. असे असताना मुंबई पालिकेच्या केडरवर हा अन्याय का, मुंबई महापालिकेच्या केडरवर अविश्वास का दाखवला जातोय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. उपायुक्तांच्या निवडीसंदर्भातील निर्णय मागे घेतलाच पाहिजे, असे ठणकावत मुंबई महापालिकेच्या केडरमधूनच उपायुक्तांची नियुक्त करा, अशी आग्रही मागणीदेखील आदित्य ठाकरे यांनी केली.