लैंगिक शोषण होताना पीडितांनी गुन्हेगारांसोबत फोटो काढायचे का? पुरावे मागणाऱ्यांना अभिनेत्रीने फटकारले

हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीतील पडद्यामागील काळी कृत्य समोर आली आहेत. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून दिग्दर्शक, अभिनेत्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. एकीकडे अनेक अभिनेत्री, अभिनेते तक्रारीसाठी पुढे येत आहेत, तर दुसरीकडे काही लोक त्यांच्याकडे पुराव्यांचीही मागणी करत आहेत. यावर आता ज्येष्ठ अभिनेती शिला यांनी परखड भाष्य केले असून लैंगिक छळाचे पुरावे मागणाऱ्यांना झोडपून काढले आहे. लैंगिक शोषण होत असताना पीडितांनी पुराव्यासाठी गुन्हेगारांसोबत फोटो काढायचा का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

शिला या मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. नुकतीच त्यांनी ‘मातृभूमी’ला मुलाखत दिली. यात त्या म्हणाल्या की, पोलीस आणि न्यायालय पीडितांकडे लैंगिक छळ झाल्याचा पुरावा मागतात. अचानक कुणीतरी मागून येऊन मिठी मारली किंवा चुंबन घेतले तर पीडितांनी त्याच्यासोबत फोटो काढायचा का? किंवा मला फोटो काढू दे अशी विनवणी पीडितांनी करायची?

लिपलॉक आणि किसींग सिनसाठी केला होता छळ, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

जुन्या काळामध्ये फक्त लँडलाईन फोन होते आणि काहीही रेकॉर्ड करण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे भविष्यामध्ये कधीतरी हेमा समितीची स्थापना होईल याचा अंदाजही पीडितांना असेल का? अशा स्थितीत अंदाज बांधताच येत नाही. त्यामुळे अशा गैरकृत्यांच्या प्रकरणामध्ये पुरावा कसा दिला जाऊ शकतो? असा सवालही शिला यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शिला यांनी मनोरमा ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटसृष्टीत येणाऱ्या महिलांच्या समस्येवरही भाष्य केले. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी महिलांना किती संघर्ष करावा लागतो याची मला कल्पना आहे. काही तरुणी आर्थिक कारणांमुळे चित्रपटसृष्टीत येतात, काही कलेबद्दल असणाऱ्या प्रेमामुळे येतात, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, चित्रपटसृष्टीतील मोजक्याच पुरुषांवर आरोप झाले आहेत. मात्र चित्रपटसृष्टीत महिलांना त्रास देणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त आहे. त्यावर कुणीही बोलत नाही. तसेच जो दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.