मुंबईकरांच्या खिशाला शेकोटीचे चटके; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची ‘कडक’ कारवाई

मुंबईत वाढणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने शेकोटी पेटवण्यावर बंदी घातली असतानाही नियम मोडला जात असल्यामुळे कारवाई करण्यात आली असून 88 जणांकडून 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कचरा, लाकूड, प्लायवूड, प्लॅस्टिक, टायर जाळून शेकोटय़ा पेटवल्या जात असल्यामुळे विषारी वायू निर्माण होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. आगामी हिवाळय़ात शेकोटय़ा पेटवणाऱयांवर आणखी ‘कडक’ कारवाई करणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत हिवाळय़ात आर्द्रता वाढल्याने हवेत धूळ, वायू, विषारी धूर जास्त वेळ टिकून राहत असल्याने प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. याशिवाय मुंबईत सुरू असलेल्या सुमारे सहा हजारांवर बांधकामांच्या ठिकाणावरून उडणारी धूळदेखील प्रदूषणास कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 23 ऑक्टोबरला नियमावली जारी करण्यात आली असून अंमलबजावणी करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. यानंतर 3 नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करणे, शेकोटी पेटवणाऱयांवर कारवाई करणे, डेब्रिज टाकणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे.

असे आहेत पालिकेचे निर्देश
हिवाळय़ात सोसायटय़ांमध्ये काम करणारे वॉचमन, सुरक्षा रक्षक, बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱया कामगारांकडून मोठय़ा प्रमाणात शेकोटय़ा पेटवल्या जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण झाल्याने प्रदूषण वाढते.
हे टाळण्यासाठी हिवाळ्यात सोसायटय़ांनी वॉचमनना हिटर, ऊबदार कपडे द्यावेत आणि बांधकामांच्या ठिकाणी पंत्राटदारांनी कामगारांना सुविधा द्याव्यात असे निर्देश पालिका प्रशासनाकडून सोसायटय़ा, बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत.

अशी होतेय कारवाई
पालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार कारवाई करण्यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून तपासणी, पाहणी केली जात आहे. यामध्ये नियम मोडल्याचे दिसल्यास रोख दंड, कामबंद नोटीस दिली जात आहे. यामध्ये उघडय़ावर कचरा जाळणारे, शेकोटय़ा पेटवण्यावरही निर्बंध घातले जात आहेत. तर रस्त्यावर राहणाऱया बेघरांना हिवाळय़ात थंडीपासून बचाव करण्यासाठी सुविधा देण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करणार आहे.