न्यायालयाच्या दट्टय़ानंतर पालिकेची कठोर नियमावली, रस्ते विभागाला तातडीने ‘एसओपी’ बनवण्याचे निर्देश
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामामध्ये धूळ प्रदूषण झाल्यास कंत्राटदारासह रस्ते विभागातील संबंधित जबाबदार कर्मचाऱयांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कंत्राटदाराला लाखोंचा दंड किंवा कठोर कारवाईदेखील होणार आहे. याबाबत अंमलबजावणीसाठी पर्यावरण विभागाकडून रस्ते विभागाला नवी नियमावली (एसओपी- स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषण वाढल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला नुकतेच फटकारल्यामुळे पालिकेने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हवेची गुणवत्ता दर्शवणारा ‘एअर क्वालिटी निर्देशांक’ (एक्यूआय) कमालीचा वाढल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे पालिकेने 25 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर करून मुंबईत सर्व सहा हजारांवर बांधकामांना त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबईतील ‘एक्यूआय’ 100 पर्यंत नियंत्रणात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र काही विभागात पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांमधील बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, मुंबई हार्बर-ट्रान्स हार्बर अशा प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ‘नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणारे हे प्रकल्प बंद करण्याचा इशारा देण्यात येईल’ असा इशाराही मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून आगामी काळात मोठय़ा प्रमाणात सुरू होणाऱया रस्ते कामांमधील प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात येणार आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णायक बैठक होण्याची शक्यता आहे.
ड्रिलिंग, ग्राइंडिंगसोबत पाण्याचा फवारा
सिमेंट-काँक्रीट मटेरियल बनवताना सिमेंट हवेत उडणार नाही याची काळजी घेणे, खड्डा खोदताना-भरताना मातीवर पाणी मारणे, काँक्रीट रोडवर चिर पाडताना ब्लेडवर पाणी मारणे, शक्य असल्या सक्शन मशीनचा वापर करणे, याशिवाय ड्रिलिंग-ग्राइंडिंग करताना पाण्याचा फवारा निरंतर सुरू राहील अशा मशीनचा वापर अशी नियमावली येण्याची शक्यता आहे.
अशी होणार कार्यवाही
रस्ते विभागाचे काम करणाऱया कर्मचाऱयांना, इंजिनीयरना प्रदूषण नियंत्रणासाठी घ्याव्या लागणाऱया नियमांची, पद्धतींची माहिती नसते. त्यामुळे पर्यावरण विभागाकडून रस्ते विभागप्रमुखासह डेप्युटी, सब इंजिनीयर्सनाही बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे.
त्यांना रस्ते काम करताना होणाऱया प्रदूषणाची माहिती दिली जाईल. शिवाय हे प्रदूषण टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली जाईल. याची अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित पंत्राटदारांना आदेश देण्यात येईल.