आचार्य-मराठे कॉलेजचा ‘ड्रेसकोड’चा निर्णय योग्यच, ‘हिजाब बंदी’विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

चेंबूरच्या ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे कॉलेजने कॅम्पसमध्ये लागू केलेल्या ड्रेसकोडच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. ड्रेसकोडसंबंधी कॉलेजच्या धोरणात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने ‘हिजाब बंदी’विरोधातील याचिका फेटाळली.

बीएससी व बीएससीच्या (कॉम्प्युटर सायन्स) द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेल्या नऊ विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. कॉलेजने हिजाबवर बंदी घालत लागू केलेला नवीन ड्रेसकोड मनमानी स्वरूपाचा आणि धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. हा दावा मान्य करण्यास खंडपीठाने नकार दिला आणि विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली.