कार भाड्याने देण्याच्या नावाखाली करायचा फसवणूक

चित्रपटाच्या शूटिंगसाठी कार भाड्याने देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आकाश सिंह याला मालवणी पोलिसांनी अटक केली. ऑगस्ट महिन्यात आकाशने तक्रारदार यांना फोन करून चित्रपट शूटिंगसाठी मोटरसायकल, चारचाकी वाहने भाडेतत्त्वावर हवी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने त्याच्या परिचित असणाऱ्यांना ती माहिती दिली होती. त्यावर विश्वास ठेवून काही वाहने आकाशला भाड्यावर दिली.

गाडी भाड्याने दिल्यानंतर आकाश हा ठरल्यानुसार रक्कम देत नव्हता. भाड्याबाबत त्याला वारंवार विचारणा केली जात होती. मात्र तो टाळाटाळ करत होता. तसेच घेतलेली वाहनेदेखील तो परत करत नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. चौकशीदरम्यान त्यांना आकाशची माहिती मिळाली.

आकाश हा भाड्याने घेतलेली वाहने परस्पर विकायचा. गाडीसाठी तक्रारदार हे वारंवार आकाशला फोन करायचे. मात्र तो फोन उचलत नव्हता. अखेर त्याने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल येणारे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून आकाशला ताब्यात घेऊन अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्याने ती भाड्यावर घेतलेली वाहने विकली होती. पोलिसांना 26 वाहने जप्त केली आहे. उर्वरित दोन वाहनांचा शोध सुरू आहे.