यशश्री शिंदे हत्या प्रकरण; आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी

नवी मुंबईसह महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीविरोधात हत्येच्या पाच दिवस आधी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं. 20 जुलै रोजी आरोपी दाऊद शेख विरोधात पोस्को अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आलं होतं. वॉरंट जारी झाल्यानंतर पाच दिवसांनी पीडितेची हत्या करण्यात आली.

पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन 2019 मध्येच आरोपी दाउद विरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षापासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. मात्र आरोपी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहत नव्हता. त्यामुळे 20 जुलै 2024 आरोपीविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढून आरोपीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर तात्काळ कारवाई झाली असती तर कदाचित पीडितेचा जीव वाचला असता.

26 जुलै रोजी मैत्रिणीकडे जाते सांगून गेलेली यशश्री घरी परतलीच नाही. यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर 27 जुलै रोजी मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत आरोपीला कर्नाटकातून अटक केली.